प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना विशेष महत्व असते. असं म्हणतात प्रत्येक समाजाचा पाया शिक्षक रचतात. अनेकदा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी शिकवलेल्या मुल्यांच्या आधारावरच समाज घडतो किंवा बिघडतो. मात्र या शिक्षकांना म्हणावे तितके महत्व दिले जात नाही अशीही टीका अनेकदा होतेच. तरी कधी ना कधी शिक्षकांच्या आयुष्यातही असा एखादा खास दिवस असतो जो त्यांच्या कायम लक्षात राहतो. असं काहीसं घडलं पंजाबमधील एक शिक्षाबरोबर.

दर वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या शिक्षकांना आवर्जून शुभेच्छा देत त्यांचे आशिर्वाद घेतो. याच दिवशी शिक्षणाच्या क्षेत्रात काहीतरी हटके करत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यावे यासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा ५ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये असाच सन्मान झाला तो पंजाबमधील सरकारी शाळेत शिकवणाऱ्या अमरजित सिंग चहल यांचा. याहून विशेष म्हणजे त्यांचे गावकऱ्यांनी अगदी एखाद्या सिनेमात शोभेल असे जंगी स्वागत केले.

शुक्रवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील बुधलादामधील अनेक नागरिक रेल्वे स्थानकांवर हार, पुष्पगुच्छ आणि ढोलताशे घेऊन दाखल झाले. अगदी एखादा सण असल्याप्रमाणे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील उत्साह जाणवत होता. ते रेल्वे स्थानकावर आले होते त्यांच्या गावातील सरकारी शाळेत शिकवणाऱ्या आणि शिक्षक दिनी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या अमरजित सिंग चहल यांच्या स्वागताला. राज्यातील सर्वात मागासलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील शिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने शहरातील प्रत्येकचा अमरजित यांचा अभिमान वाटत होता.

अमरजित यांच्या स्वागताला सामान्य नागरिकांबरोबरच त्यांनी ज्या ज्या पंचायतीअंतर्ग येणाऱ्या शाळांमध्ये काम केले त्या पंचायत समितीचे सदस्य, जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, आपचे स्थानिक आमदार बुधा राम हे सर्वच जण उपस्थित होते. विशेष म्हणजे अमरजित ज्या ट्रेनने आले ती ट्रेन चार तास उशीरा आली तरी अनेकजण रेल्वे स्थानकातच थांबून होते.

अमरजित रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर त्यांना फुलांचे हार घालून, पुष्पगुच्छ देऊ त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात ते रेल्वे स्थानकाबाहेर आले. त्यानंतर ओपन जीपमधून त्यांची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी अनेक स्थानिक रस्त्याच्या दूतर्फा उभे असलेले दिसले. अमरजित यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील सरकारी चार शाळांना स्मार्ट शाळा बनवले आहे.

एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आपले झालेले स्वागत पाहून अमरजित यांना भरुन आले. ‘एखाद्या शिक्षकाचे अशाप्रकारे कोण स्वागत करते? त्यातही तो शिक्षक सरकारी शाळेतील असेल तर ही शक्यता कमीत. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रेमामुळे मी कृतकृत्य झालो आहे,’ असे मत अमरजित यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना व्यक्त केले.