कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. पण आता हळूहळू काँग्रेस-जेडीएस सरकारमध्ये मतभेद समोर येऊ लागले आहेत. काँग्रेस वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा यांनी आमच्या पक्षाला गृहित धरु नका असा इशाराच काँग्रेसला दिला आहे.

मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळयाला सहा पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षांनी एकत्र निवडणूक लढणे गरजेचे नाही असे देवेगौडा नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मे महिन्यात बंगळुरुमध्ये कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला. त्यावेळी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, बसप, आप, सीपीएम आणि टीडीपीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४० जागा वाटून घेण्यासंबंधी समाजवादी पार्टी आणि बसपमध्ये चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगामध्ये तृणमुल आणि काँग्रेसमध्ये निवडणूक एकत्र लढवण्यावर एकमत झाले आहे. पण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशात टीडीपी आणि तेलंगणमध्ये टीआरएस या पक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही असे देवेगौडा म्हणाले.

फक्त कर्नाटकात आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कुमारस्वामी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यासंबंधी चर्चा करतील. पुढच्या काही दिवसात मी बिगर एनडीए पक्षाच्या नेत्यांची भेट घेईन असे देवेगौडा म्हणाले. आम्ही कर्नाटकात बसपाला लोकसभेची एक जागा सोडणार असून त्याबदल्यात उत्तर प्रदेशात एक जागा मागणार आहोत असे देवेगौडा यांनी सांगितले. केरळमध्ये एलडीएफ आम्हाला एक जागा देईल असे देवेगौडा म्हणाले.

कर्नाटकात १०४ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसकडे ८० आणि जेडीएसकडे ३८ जागा आहेत. फक्त भाजपाला सत्ता मिळू नये यासाठी काँग्रेस-जेडीएसने आघाडी केली. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसने मोठा पक्ष असूनही जेडीएसला मुख्यमंत्रीपद दिले.