कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सूतोवाच

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशी जनतेच्या आशीर्वादाने आपण ‘किंगमेकर’ नाही, तर ‘किंग’च बनेन असा विश्वास धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी रविवारी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक पक्षासाठी अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे खंडनही केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत धजद स्वबळावर सत्तेत येईल. कोणाचाही टेकू न घेता व कोणालाही टेकू न देता आपणच मुख्यमंत्री बनू याबाबत शंका नाही. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षांच्या कामगिरीची तुलना कर्नाटकच्या जनतेने करावी आणि धजदला एकदा संधी द्यावी, असे आवाहन कुमारस्वामी यांनी मतदारांना केले.

तसेच आपण ११३ जागांवर लक्ष केंद्रित केले असून त्या जागा जिंकण्याचा विश्वास वाटत असल्याचे ते म्हणाले. धजद ९७ ते १०५ जागा जिंकणार आहे. आता बहुमताच्या आकडय़ासाठी उर्वरित ७-८ जागांवर लक्ष देत असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. यामुळे कोणत्याही पक्षाचा पाठिंबा लागणार नसल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा वर्षांपासून पक्षाकडे सत्ता नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. सर्व कार्यकर्ते नव्या जोमाने काम करत आहेत.