काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षातील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या अन्य नेत्यांवर सोपवायला तयार नसल्याची टीका माजी केंद्रीय नेते एच. आर. भारद्वाज यांनी केली. त्यांच्याभोवती खुशामत करणाऱ्या आणि भ्रष्टाचारी लोकांचा गराडा पडल्याचे झणझणीत बोलसुद्धा एच. आर. भारद्वाज यांनी काँग्रेसला सुनावले आहेत.
त्यांनी मला काँग्रेसमधून बाहेर काढले. टूजी प्रकरणात त्यांच्याभोवती असलेल्या काही लोकांचे म्हणणे न ऐकल्याने मला मंत्रिपदावरून दूर केले गेले. घोटाळ्यांमध्ये याच भ्रष्ट नेत्यांचा हात असल्याने काँग्रेस पक्ष लयाला गेल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला.
आमच्या सर्वोच्च नेत्याला न्यायालयाकडून समन्स बजावले जाणे, ही आमच्यासाठी अत्यंत दु:खाची बाब आहे. मात्र, या सगळ्यात पंतप्रधानांच्या स्तरावरील व्यक्तीही गुंतल्या होत्या. सोनिया गांधी यांना या सगळ्याची जाणीव नव्हती का, हे कुणी आणि का घडवले, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सगळ्यांना सगळे माहित होते. मात्र, दुसऱ्या कोणाकडे जबाबदारी द्यायची नाही आणि तरीही सर्वकाही करायचे, हीच काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती असल्याचे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले.
यावेळी त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनादेखील लक्ष्य केले. राहुल गांधी तरूण आहेत परंतु त्यांनी पक्षाच्या कार्यात जास्तीत जास्त लक्ष घातले पाहिजे. त्यांनी जबाबदारीपासून पळणे आता सोडून दिले पाहिजे. तर, प्रियांका गांधी यांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठीच रॉबर्ट वडेरांचे प्रकरण उकरून काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.