शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा अमेरिकेचा निर्णय
महसुलात वाढ करण्यासाठी अमेरिकी संसदेने एच१बी आणि एल-१ या व्हिसांच्या शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एच १ बी व ए-१ व्हिसा शुल्कवाढीचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे. उल्लेखनीय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत या व्हिसाशुल्कात वाढ न करण्याची शिफारस केली होती.
अमेरिकी संसदेने गुरुवारी रात्री उशिरा १.१ ट्रिलियन डॉलर खर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. त्यात एच १ बी व्हिसाच्या काही विशिष्ट श्रेणींच्या तर एल-१ व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या व्हिसांसाठी अनुक्रमे चार हजार व साडेचार हजार डॉलर शुल्क मोजावे लागणार आहे. त्यामुळे अमेरिकी सरकारच्या तिजोरीत वार्षिक एक अब्ज डॉलरची भर पडणार आहे.

भारतीय कंपन्यांचे नुकसान
दोन्ही व्हिसांच्या शुल्कवाढीचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे. अनेक भारतीय आयटी कंपन्यांचे प्रकल्प अमेरिकेत आहेत. त्यामुळे अमेरिकी महसूलवाढीत भारतीय कंपन्यांचा मोठा वाटा आहे.