अमेरिकेतील काही आउटसोर्सिग संस्था या एच १ बी व एल १ व्हिसा व्यवस्थेचा गैरवापर करीत असून तो अध्यक्ष ट्रम्प यांनी थांबवावा, असे आवाहन अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांनी केले आहे. आउटसोर्सिग संस्था अमेरिकी कामगारांना नोकऱ्या देण्याचे सोडून स्वस्तातील परदेशी कर्मचारी घेतात व त्यासाठी एच १ बी व एल १ व्हिसा व्यवस्थेचा गैरवापर करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की एच १ बी व्हिसा प्रणालीतील उणिवा दूर करतानाच त्याचा फेरआढावा घेण्यासाठी आम्ही एक विधेयक मांडले असून त्यात उच्च प्रशिक्षित अमेरिकी कर्मचाऱ्यांना डावलण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उपाययोजना आहेत.

गेली अनेक वर्षे अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या बदल्यात स्वस्तातील परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्या एच १ बी व्हिसाचा वापर करीत आहेत. एच १ बी व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी प्रयत्न करावेत, पण त्याच्या जोडीला ही सगळी व्यवस्थाच बदलण्याचा विचार करावा. आमच्या विधेयकात एच १ बी व्हिसा कार्यक्रम अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राबवण्यावर भर दिला आहे, असे या पत्रात म्हटले आहे. एच १ बी व्हिसाचा वापर करून अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना कमी वेतन देऊन कामावर ठेवतात व त्यामुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांना संधी मिळत नाही. एल १ व्हिसा हा आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळतो.

या कंपन्यांची कार्यालये अमेरिका व परदेशातही असतात, त्यामुळे हा व्हिसा परदेशी कर्मचाऱ्यांना कमी वेतनात अमेरिकी कार्यालयात हलवण्याची सवलत देतो. परदेशातील कार्यालयात एक वर्ष काम केलेले कर्मचारी अमेरिकेतील कार्यालयात आणले जाऊ शकतात.

ट्रम्प प्रशासन सध्या एच १ बी व्हिसा धोरणाचा फेरआढावा घेत असून अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या बदल्यात स्वस्तातील परदेशी कर्मचारी घेण्यासाठी या व्हिसाचा वापर केला जात असल्याची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. परदेशातून कर्मचारी घेण्यापूर्वी देशातील कर्मचाऱ्यांना पूर्ण संधी देण्याची अट नवीन विधेयकात घातली आहे.