एच १ बी व्हिसा मुदतवाढ नाकारण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या हालचाली

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाचा अमेरिकेतील भारतीय नागरिकांना फटका बसण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अमेरिकेत ग्रीनकार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींना एच १ बी व्हिसा मुदतवाढ न देण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासन घेण्याची शक्यता आहे. हा निर्णय लागू झाल्यास किमान पाच लाख कुशल भारतीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेतून मायदेशी परतावे लागेल. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या या हालचालींविरोधात पडसाद उमटू लागले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत एच १ बी व्हिसा धोरण कठोर करण्याची भूमिका मांडली होती. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसा प्रक्रिया कडक करण्याचा आदेश जारी केला. आता एच १ बी व्हिसाला मुदतवाढ न देण्याची हालचाल सुरू आहे.

सध्या तीन वर्षांसाठी वैध असलेल्या एच १ बी व्हिसाला आणखी तीन वर्षे मुदतवाढ दिली जात होती. जर त्यानंतर त्याचा ग्रीन कार्डसाठीचा म्हणजे कायम वास्तव्य करण्याचा अर्ज प्रलंबित असेल तर ग्रीन कार्ड मिळेपर्यंत एच १ बी व्हिसाला मुदतवाढ दिली जात होती. मात्र, ही मुदतवाढ नाकारण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या विचाराधीन असल्याचे वृत्त अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

सध्या ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या मोठी असून, त्यात भारत व चीन या दोन देशांतील कुशल कर्मचारी आघाडीवर आहेत. मात्र, ट्रम्प प्रशासनाने मुदतवाढीस नकाराचा निर्णय घेतला तर सहा वष्रे एच १ बी व्हिसावर अमेरिकेत राहूनही ग्रीन कार्ड मिळू न शकलेल्या व्यक्तींना ग्रीनकार्डची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मायदेशी परतावे लागेल.

अमेरिकेतील कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी मुख्यत: एच १ बी व्हिसाची तरतूद आहे. मात्र, अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी इतर देशातील नागरिकांनी त्याचा वापर केल्याचा ट्रम्प यांचा आक्षेप आहे.

‘भारत-अमेरिकेसाठी नुकसानकारक पाऊल’

एच १ बी व्हिसाला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्याचे पाऊल भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी नुकसानकारक ठरेल, अशी भीती नॅसकॉमने व्यक्त केली आहे. अशा निर्णयामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या सुमारे दहा लाख कुशल कर्मचाऱ्यांना आपापल्या मायदेशी परतावे लागेल. त्यातील बहुतांश भारतीय आहेत. हा मुद्दा केवळ भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांपुरता सीमित नसून, एच १ बी व्हिसाधारकांबरोबरच कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता असलेल्या अमेरिकेलाही या निर्णयाचा फटका बसेल, असे नॅसकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा यांनी मात्र अमेरिकेतील या हालचालींचे स्वागत केले आहे. ‘असा निर्णय झालाच तर मी म्हणेन, मायदेशी आपले स्वागत आहे. भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी तुम्ही वेळेवर मायदेशी परतत आहात’, असे ट्वीट त्यांनी केले आहे.