कॅनडातील अल्बर्टा राज्यात एच१ एन१ फ्लूचा संसर्ग पसरला असून तेथे पाच जणांना मृत्यू झाला आहे तर एक हजार लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. या प्रांतात आता लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोग्यमंत्री फ्रेड हॉर्न  यांनी सांगितले, की गेल्या काही आठवडय़ात अल्बर्टा येथे इन्फ्लुएंझाची साथ सुरू आहे. अनेक सुदृढ प्रौढ लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे.या प्रांतात फ्लूचे एकूण ९६५ रुग्ण सापडले असून आणखी २५० जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. होर्न यांनी सांगितले, की अल्बर्टाच्या पाच जणांचा अतिदक्षता विभागात उपचार घेताना मृत्यू झाला. अनेक प्रौढ लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे. दर पाच रहिवाशांपैकी एकाला फ्लूची लागण झाली आहे.
फ्लूवर लसीकरणाला उत्तेजन देण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून त्यांचे कामाचे तासही वाढवण्यात आले आहेत. स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्यांनी एडमंटन व कॅलगरी या शहरात लसीकरणासाठी रांगा लागल्याची दृश्ये दाखवली. फेब्रुवारी हा फ्लूचा काळ असाो त्यामुळे रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. इतर प्रदेशातही हा संसर्ग पसरत असून ओंटारियो येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असे समजते.