अमृतसर येथील रावण दहनाच्या कार्यक्रमाच्या वेळी घडलेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मात्र मी किमान दहावेळा लोकांना सांगितले होते की रेल्वे ट्रॅकवर उभे राहू नका अशा सूचना दिल्या होत्या. लोकांनी माझे ऐकले नाही. मी रावण दहन कार्यक्रमासाठी संमती घेतली नव्हती असाही प्रश्न निर्माण केला जातोय मात्र मी आवश्यक सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या अशी माहिती रावण दहन कार्यक्रमाचा आयोजक सौरभ मदन याने दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला त्याने ही माहिती दिली आहे. इतकेच नाही तर जो अपघात घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र मला काही लोक दोष देण्याचा प्रयत्न करत आहेत, माझा यात दोष नाही. तुम्हाला जर माझा दोष वाटत असेल तर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो मात्र ट्रॅकवर उभे राहू नका अशा सूचना मी किमान दहावेळा दिल्या होत्या असे या आयोजकाने म्हटले आहे.

 

अमृतसरमध्ये रावण दहन सुरु असताना जमलेले अनेक लोक रेल्वे रुळांवरही उभे होते. या सगळ्यांना चिरडून एक ट्रेन अत्यंत वेगात गेली. या दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला. तर ५१ लोक जखमी झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे प्रखर दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि क्षणार्धात लोहमार्गावर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली. या प्रकरणी भाजपाने काँग्रेस प्रशासनावर आणि सरकारवर खापर फोडले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळालाच पाहिजे अशीही मागणी केली आहे. अशात आता आयोजकांचे काय म्हणणे आहे तेदेखील समोर आले आहे.

अमृतसरची दुर्घटना रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी घडली. ज्यानंतर संपूर्ण देश हळहळला होता. तसेच रेल्वे रुळांच्या इतक्या जवळ रावण दहन कार्यक्रमास परवानगी देण्यातच कशी आली असाही प्रश्न विचारण्यात आला होता. आता आयोजकांनी या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे तसेच रावण दहन होत असताना लोकांना दहावेळा बजावले होते मात्र लोकांनी ऐकले नाही असेही आयोजकाने म्हटले आहे.