जमात- उद -दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद, याच्या मेहुण्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हाफिजचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की हा दहशतवाद्यांसाठी नमाज अदा करताना दिसतो आहे. त्याचे काही सहकारी आणि तो या व्हिडीओत दहशतवाद्यांसाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. इंडिया टुडेने या संदर्भातला व्हिडीओ ट्विटरवर प्रसारित केला आहे.

२४ जून रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर या दहशतवादी श्रीनगरमधल्या शाळेत लपले होते. ज्यांना ठार करण्यात आले आहे. मात्र अब्दुल रहमान मक्कीचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्या व्हिडीओत नमाज-ए-जनाजा अदा केली जाते आहे. जमात उद दावाचा प्रमुख नेता सैफुल्ला खालिद हा ठार झालेल्या दहशतवाद्यांचे कौतुक करतो आहे. हाफिज सईदच्या गैरहजेरीत जमात- उद -दावा या दहशतवादी संघटनेचे नेतृत्त्व त्याचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की करतो आहे.

रमजान ईदच्या दिवशीच त्याचा दहशतवाद्यांसाठी नमाज अदा करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. लष्कर -ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दोन दहशतवादी संघटना पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवत आहेत. तुम्ही काश्मिरात लढणाऱ्या लष्करच्या दहशतवाद्यांसाठी काहीही करू शकत नसाल तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहनही या व्हिडीओत मक्की करताना दिसतो आहे.

दहशतवादी आणि मुंबईत झालेल्या २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद पाकिस्तानच्या नजरकैदेत आहे. त्याच्या दहशतवादी कारवाया आणि इतर कुरापतींना प्रोत्साहन देण्याचे काम सध्या मक्कीकडे आहे. अमेरिकेने २०१४ मध्येच जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना असल्याचे म्हटले आहे. मात्र पाकिस्तानात या संघटनेच्या कारवाया खुलेआमपणे चालताना दिसत आहेत. तसेच भारतात घुसखोरी करणे, दहशतवादी हल्ले करणे असलेही प्रकार या संघटनांकडून सुरू असतात.

मागच्याच आठवड्यात मक्कीचा थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा व्हिडीओ समोर आला होता. आम्ही काश्मीरसाठी ‘आझादी’मिळवणारच असा इशारा मक्कीने दिला होता. तसेच प्रसारमाध्यमांनी आम्हाला साथ दिली तर दोन ते तीन आठवड्यात आम्ही काश्मीर भारतापासून वेगळे करू असाही दावा मक्कीने या व्हिडीओत केला होता.