श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात हिंसाचार आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात टेरर फंडिंगच्या आरोपाखाली २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदच्या नावाचाही समावेश आहे.


हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याचा खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराला २०१७मध्ये काही फुटिरतावाद्यांनी आणि दहशतवादी संघटनांनी पैसा पुरवल्याचा संशय आहे. यानंतर एनआयएने या प्रकरणी चौकशीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याचिका दाखल झाल्यानंतर एनआयएने कट्टरपंथी फुटिरतावादी सय्यद अली शाह गिलानीचा जावई अल्ताफ फंटुश, हुर्रियत नेता शाहिद उल इस्लाम, अयाज अकबर यांच्यासह इतर अनेकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

आरोपपत्रात काश्मीरमधील बडे फुटिरतावादी नेते आणि व्यावसायिकांचीही नावे आहेत. एनआयएने ६ महिन्यांपूर्वी टेरर फंडिंग प्रकरणी चौकशीनंतर आरोपपत्र दाखल केले आहे. तत्पूर्वी एनआयएने टेरर फंडिंगप्रकरणी अनेक पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे आज न्यायालयात सादर केले जाणार आहेत.