काश्मीरमध्ये हिंसाचाराची आग पेटली आहे या आगीत तेल ओतण्याचे काम जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिजने केला आहे. आता तर भारताला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तान सैन्याने सरळ भारतात घुसावे अशी गरळ त्याने ओकली आहे. पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये जावे आणि भारताला धडा शिकवावा असे प्रक्षोभक आवाहन त्याने केले आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तान माध्यमांच्या माहितीनुसार त्याने यासंदर्भात पाकिस्तानच्या एका लष्करी अधिका-याची मदत देखील मागितली होती. ‘काश्मीरची जनता रस्त्यावर उतरली आहे, काश्मीमधले छोटो मोठे पक्ष एक झाले आहेत आता सगळ्यांनी एकत्र येऊन मोठी चळवळ सुरू करा. काश्मीर हिंसाचारात मारले गेलेल्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका’ अशी चेतावणीखोर भाषणही त्याने मंगळवारी लाहोरमध्ये दिले. तर भारतीय सैनिकाने ठार केलेला बुरहान वाणी हा दहशतवादी माझ्याशी बोलला, आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी ‘बलिदान’ दिले अशा फुशारक्याही त्यांनी भाषणाच्यावेळी मारल्या. काही दिवसांपूर्वी काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होईल असा इशाराही त्याने दिला होता. तर काश्मीर मधला हिंसाचार घडवणा-या लोकांना पाठिंबा देणे ही पाकिस्तानची नैतिक आणि राजकिय जबाबदारी असल्याचे त्याने म्हटले होते. काश्मीरमधला फुटीरतावादी नेता सईद अली शहा गिलानी यांच्या काश्मीर विषयीच्या चार मागण्या मान्य करव्यात आणि काश्मीर खो-यातून सैन्य भारताने हटवावे अन्यथा युद्ध हा एकमेव पर्याय असेल अशीही धमकी त्याने दिली. भारतील २६/ ११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या हाफिज सईदने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात आंदोलन केली होती.