अकरा महिन्यांनंतर नजरकैदेतून सुटलेला जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हाफिज सईदने नवाझ शरीफ यांना ‘देशद्रोही’ म्हटले आहे. नवाझ शरीफ यांनी शत्रूराष्ट्र असलेल्या भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचा देशद्रोह केला, असे सईदने म्हटले.

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदची ११ महिन्यांनंतर नजरकैदेतून सुटका झाली. यानंतर हाफिजच्या समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. शिक्षा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पुरावे नसल्याने सईदची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आली. यानंतर शुक्रवारी मशिदीत झालेल्या प्रार्थनेनंतर हाफिजने भारताविरुद्ध गरळ ओकली. यावेळी त्याने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असतानाच हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. शरीफ यांच्या या निर्णयाचे भारताने कौतुक केले होते. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानमध्ये मोकाट फिरतो, यावरुन भारताने पाकिस्तानवर अनेकदा टीका केली होती. यानंतर सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे हाफिजने शरीफ यांच्यावर घणाघाती टीका केली. ‘पंतप्रधानपद का गमवावे लागले, असे शरीफ विचारतात. त्यांनी देशद्रोह केल्यानेच त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले, हे मी त्यांना सांगू इच्छितो. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मैत्री करुन देशद्रोह केला,’ असे हाफिज सईदने म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जुलै महिन्यात नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये नाव समोर आल्याने त्यांच्यावर पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याची नामुष्की ओढावली. मात्र शरीफ यांचा पक्ष आजही सत्तेत असून शाहिद खाकन अब्बासी यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व आहे. ‘भारताशी युद्ध हा पर्याय असू शकत नाही. काश्मीर प्रश्न चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो,’ अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच अब्बासी यांनी मांडली होती.