मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या दोन प्रकरणात पाकिस्तानी न्यायालायने सईदला दोषी धरले आहे. न्यायालायने त्याला ११ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी ही शिक्षा सुनावली.

संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या सईदवर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे इनाम ठेवले आहे. दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याच्या प्रकरणात १७ जुलैला त्याला अटक झाली. सईदला लाहोरच्या कोट लखपत जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. लाहोर आणि गुजरनवाला शहरात सईद विरोधात दहशतवादाला अर्थसहाय्य केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही प्रकरणात न्यायालयाने सईदला प्रत्येकी साडेपाच वर्ष तुरुंगवास आणि १५ हजार दंड ठोठावला आहे.

दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद हुसेन भुट्टा यांनी गेल्या आठवडय़ात जमात उद दवाचा प्रमुख हाफिज सईद याच्या विरोधातील दोन खटल्यांचा निकाल राखून ठेवला होता. दहशतवादाला अर्थपुरवठय़ाशी संबंधित सर्व खटले एकत्र करून त्याची सुनावणी करावी व त्यानंतरच निकाल जाहीर करावा, अशी विनंती करणारा अर्ज सईद याने लाहोर येथील दहशतवाद विरोधी न्यायालयात केला होता.