जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने राजकारणात उडी घेतली आहे. हाफिज सईदने ‘मिल्ली मुस्लिम लीग’ नावाने पक्षाची स्थापना केली आहे. हाफिजने जमात-उद-दावाच्या सैफुल्ला खालिदची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच हाफिज सईदने पक्षाच्या स्थापनेसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. हाफिज सईद मागील ६ महिन्यांपासून नजरकैदेत आहे.

मागील आठवड्यातच हाफिज सईदने पक्ष स्थापनेसाठी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केल्याचे वृत्त होते. यानंतर आज (सोमवारी) हाफिज सईदने पक्षाची स्थापना झाल्याची घोषणा केली. ‘मिल्ली मुस्लिम लीग’च्या माध्यमातून पाकिस्तानच्या राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा उठवण्याचा हाफिज सईदचा मानस आहे. २०१८ मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सईदने पक्ष बांधणीला सुरुवात केली असून लवकरच पक्षाच्या चेहऱ्यांच्या नावांची घोषणा केली जाईल, असे सईदने म्हटले आहे.

‘मिल्ली मुस्लिम लीग’च्या स्थापनेची घोषणा करताना पक्षाच्या माध्यमातून काश्मीरचा मुद्दा उचलण्यात येईल, असे सईदने स्पष्ट केले. मात्र सईदने स्वत:ला आणि अब्दुल रहमान मक्कीला पक्षापासून दूर ठेवले आहे. सध्या पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद गमवावे लागले आहे. याशिवाय शरीफ यांच्यावर कायम टीका करणाऱ्या तहरीक-ए-इन्साफचे इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लिल मेसेज पाठवल्याचे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे इम्रान खान अडचणीत आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांच्या हकालपट्टीचे आदेश दिल्याने आणि इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने गंभीर आरोप केल्याने पाकिस्तानच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सईदने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.

नवाज शरीफ, इम्रान खान संकटात असल्याच्या संधीचा फायदा घेत राजकारणात पाय रोवण्याचा हाफिज सईदचा मानस आहे. याशिवाय पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांच्यासोबतही हाफिजचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे राजकारणात येऊन सद्यस्थितीचा फायदा घेऊन बस्तान बसवण्याचा हाफिज सईदचा प्रयत्न आहे. हाफिज सईद गेल्या ६ महिन्यांपासून नजरकैदेत आहे. जमात-उद-दावावर कारवाई न केल्यास पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात आल्याची तंबी अमेरिकेकडून देण्यात आली होती. यानंतर हाफिजला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.