18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

हाफिज सईदच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धक्का; पक्ष नोंदणीचा अर्ज बाद

निवडणूक आयोगाकडून हाफिज सईदचा अर्ज रद्द

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 12:17 PM

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद. (संग्रहित छायाचित्र)

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा म्होरक्या हाफिज सईदच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पाणी फेरले आहे. राजकीय पक्ष स्थापन करुन देशभरात निवडणूक लढवण्याचा हाफिज सईदचा मानस होता. मात्र हाफिज सईदने पक्ष स्थापनेसाठी केलेला अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यामुळे हाफिज सईदला जबरदस्त झटका बसला आहे.

हाफिज सईदने ‘मिल्ली मुस्लिम लीग’ नावाने पक्ष काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. यासाठी त्याने ‘जमात-उद-दावा’चे नाव बदलून ते ‘मिल्ली मुस्लिम लीग’ केले होते. हाफिज सईदने केलेल्या या अर्जावर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने जोरदार आक्षेप घेतला होता. दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या एखाद्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता कशी काय मिळू शकते, असा आक्षेप गृह मंत्रालयाकडून नोंदवण्यात आला होता. यासाठी गृह मंत्रालयाकडून निवडणूक आयोगाला पत्रदेखील देण्यात आले होते. यानंतर निवडणूक आयोगाने ‘मिल्ली मुस्लिम लीग’ला प्रथम गृह मंत्रालयाची परवानगी घेण्यास सांगितले.

निवडणूक आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे हाफिज सईदला दणका बसला आहे. ‘गृह मंत्रालयाच्या पत्रातून ‘मिल्ली मुस्लिम लीग’ला दहशतवादी संघटनांचे समर्थन असल्याचे स्पष्ट होते,’ असे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सरदार मोहम्मद रझा खान यांनी ‘मिल्ली मुस्लिम लीग’च्या वकिलांना सुनावले. ‘मिल्ली मुस्लिम लीगने आधी गृह मंत्रालयाची परवानगी घ्यावी आणि मगच पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करावा,’ असेही निवडणूक आयोगाने म्हटले.

‘मिल्ली मुस्लिम लीग’कडून सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला सांगितले. राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी गरजेच्या असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्याचे पक्षाच्या वकिलांनी सांगितले. मात्र निवडणूक आयोग भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे हाफिजला धक्का बसला आहे. हाफिज सईदने ऑगस्टमध्ये पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केला होता. राजकीय पक्ष स्थापन करुन पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा हाफिज सईदचा मानस होता.

First Published on October 12, 2017 12:17 pm

Web Title: hafiz saeed linked mmls registration application rejected by pakistan election commission