पाक संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीझ सईद हा पाकिस्तानच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरू शकतो आणि त्याला नजरकैद करण्यात देशाचे व्यापक हित होते, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. जर्मनीतील म्युनिच येथे पार पडलेल्या संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत आसिफ यांनी रविवारी हे विधान केल्याचे वृत्त ‘द नेशन’ या वृत्तपत्राने दिले आहे.

पाकिस्तानने आजवर सईदच्या कारवायांवर पांघरूण घातले होते. मात्र आता बदलत्या जागतिक वातावरणात ते शक्य नसल्याने पाकिस्तानला त्यावर कारवाई करावी लागली आहे. त्यानंतर सईदचा दहशतवादाशी संबंध असल्याची अधिकृत कबुली पाकिस्तानी सरकारी पातळीवरून प्रथमच दिली जात आहे.

मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने मागणी केल्याने सईदला पाकिस्तानमध्ये काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते; पण २००९ साली तेथील न्यायालयाने त्याला मुक्त केले. ताज्या दहशतवादी कारवायांनंतर त्याच्यावर कारवाई करण्याचा दबाव भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर आला. त्यानंतर पाकिस्तानने ३० जानेवारी २०१७ रोजी दहशतवादविरोधी कायद्याच्या चौथ्या परिशिष्टान्वये सईदला लाहोर येथे पुन्हा नजरकैद केले आहे. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला त्याच्यावर देशातून बाहेर जाण्याची बंदी घालण्यात आली. विविध दहशतवादी कृत्यांत सहभागी असल्याने अमेरिकेने सईदवर १० दशलक्ष डॉलरचे बक्षीस लावले आहे.

दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी निगडित नाही. दहशतवादी ख्रिश्चन, मुस्लीम, बौद्ध किंवा हिंदू नसतात. ते केवळ दहशतवादी असतात, गुन्हेगार असतात, असे आसिफ म्युनिचमधील परिषदेतील चर्चेवेळी म्हणाले. अमेरिकेच्या नव्या धोरणावर भाष्य करताना आसिफ म्हणाले, की पाकिस्तान दहशतवादाचा मुकाबला करण्यास कटिबद्ध आहे. देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रति असलेली जबाबदारी निभावण्यासाठी पाकिस्तान कायम प्रयत्न करेल. मात्र पाश्चिमात्य देशांनी पाकिस्तानला एकटे पाडण्याची भूमिका घेतली, तर त्याचा दहशतवादविरोधी लढाईत उपयोग होण्याऐवजी उलटा परिणाम होईल. उलट दहशतवादाला प्रोत्साहनच मिळेल, असेही आसिफ म्हणाले.

पाकिस्तानमध्ये गेल्या महिन्याभरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत १०० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत.