यंदा भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी २ लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे. मात्र, एअर इंडियाने त्यांच्या विमानातून ‘जम जम’ पाणी आणण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे हज यात्रेकरु चिंतेत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एअर इंडियाच्या जेदाह-हैदराबाद-मुंबई आणि जेदाह-मुंबई या दरम्यान उडणाऱ्या विमानांमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत जम जम पाणी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. 4 जुलै 2019 रोजीचं एअर इंडियाच्या जेदाह येथील कार्यालयातून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

‘विमानांमध्ये झालेला बदल आणि मर्यादित आसन संख्या यामुळे जम जम पाण्यासाठी लागणारे कॅन पुरवता येणार नाही’ असं या परिपत्रकात म्हटलं आहे. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर चिंताग्रस्त हज यात्रेकरुंनी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थी करण्याची मागणी केली. त्यानंतर पटेल यांनी केंद्रीय नागरी उड्डयन आणि अल्पसंख्याक मंत्रालयाकडे पत्र लिहून ‘एअर इंडियाला यात्रेकरुंसाठी जम जम पाणी आणण्याची व्यवस्था करण्याचे आदेश द्यावेत’ अशी विनंती केली आहे. ‘जम जम पाणी पवित्र मानलं जातं आणि त्याचं वेगळं धार्मिक महत्त्व आहे. या पाण्यामुळे अनेक आजार बरे होतात असा समज आहे. त्यामुळे हज यात्रेकरुंना ते पाणी घेऊन येण्याची परवानगी द्यावी’ असं पटेल यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘हज परिषद आणि एअर इंडियामध्ये झालेल्या करारानुसार हज यात्रेकरुंना जम जम पाण्यासाठी 5 लिटर कॅन पुरवणं एअर इंडियासाठी बंधनकारक आहे’, अशी प्रतिक्रिया हज परिषदेचे भारतातील सीईओ एम. ए. खान यांनी दिली. दरम्यान, गेल्या महिन्यात जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सौदीचा युवराज मुहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी 2 लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे.