राफेल फायटर विमानांच्या खेरदी व्यवहारात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत असताना या सरकारी कंपनीने आपल्या उत्पन्नाचे आकडे जाहीर केले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात कंपनीने आतापर्यंतची सर्वोच्च १८,२८,३८६ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. त्याआधीच्या २०१६-१७ या वर्षात कंपनीने १७,६०,३७९ लाख रुपयांची उलाढाल केली होती.

कंपनीने एकूण ४० विमाने आणि हॅलिकॉप्टरची निर्मिती केली. यामध्ये सुखोई-३०, एलसीए तेजस, डॉर्नियर विमाने तसेच एएलएच ध्रुव आणि चीतल हॅलिकॉप्टरचा समावेश आहे. त्याशिवाय १०५ नव्या इंजिनांचे उत्पादन केले. २२० विमाने/हेलिकॉप्टर आणि ५५० इंजिन्सची दुरुस्ती केली. अवकाश कार्यक्रमासाठी १४६ एअरो स्ट्रक्चरचे उत्पादन केले.

एचएएलने शेअर होल्डर्सच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हे आकडे जाहीर केले. राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात एचएएलसारख्या अनुभवी कंपनीला डावलून अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सला झुकते माप देण्यात आले. रिलायन्स डिफेन्सला ऑफसेट कंत्राट का दिले ? असा प्रश्न काँग्रेसने मोदी सरकारला विचारला आहे. एचएएलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर माधवन यांनी कंपनीच्या २०१७-१८ वर्षातील दमदार कामगिरीची माहिती देतानाच भविष्यातील योजनांची माहिती दिली. २०१७-१८ मध्ये कर लावण्याआधी ३,३२,२८४ लाख रुपये नफा झाला. त्याआधीच्या वर्षात ३,५८,२८४ लाख रुपये नफा झाला होता. कर वजा केल्यानंतर शुद्ध नफा २,०७,०४१ लाख रुपये झाला.