इंडियन एअर फोर्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) देशांतर्गत संरक्षण क्षेत्रातील मोठा करार झाला आहे. एअर फोर्स एचएएलकडून सपोर्ट पॅकेजसह ८३ सिंगल सीटर तेजस फायटर विमाने विकत घेणार आहे. आधी ८३ फायटर विमानांसाठी ५६,५०० कोटी रुपये मोजावे लागणार होते. पण आता हा संपूर्ण व्यवहार ३९ हजार कोटी रुपयांमध्ये अंतिम झाला आहे.

वर्षभरातील चर्चेच्या वेगवेगळया फेऱ्यानंतर ही किंमत १७ हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. ८३ तेजस मार्क-१ए विमानांच्या निर्मितीसाठी एचएएलने सुरुवातीला जी किंमत सांगितली होती, त्याने संरक्षण मंत्रालय आणि इंडियन एअर फोर्सला धक्का बसला होता. आता ३९ हजार कोटी रुपयांना अंतिम व्यवहार निश्चित झाला असून, खरेदी संदर्भातील फाईल अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीला पाठवण्यात येणार आहे.

आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे ३१ मार्च पूर्वी या फाईलवर मंजुरीची मोहोर उमटणे आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वप्रथम संरक्षण खरेदी परिषदेने ४९,७९७ कोटींना ८३ तेजस विमानांच्या खरेदी व्यवहाराला मंजुरी दिली होती. पण त्यानंतर एचएएलने किंमत वाढवून ५६ हजार कोटी केली. सध्या इंडियन एअर फोर्सकडे ३० स्क्वाड्रन्स आहेत. चीन आणि पाकिस्तानचा एकाचवेळी मुकाबला करण्यासाठी ४२ स्क्वाड्रन्सची आवश्यकता आहे.

यावर्षी मे महिन्यात पहिली चार राफेल विमाने भारतात दाखल होतील. उर्वरित ३२ राफेल फायटर विमाने २०२२ पर्यंत टप्याटप्याने भारतीय हवाई दलात दाखल होतील. आयएएफच्या सुलूर येथील ‘फ्लाईंग डॅगर्स’ स्क्वाड्रनला आतापर्यंत ४० पैकी १६ तेजस मार्क-१ फायटर विमाने मिळाली आहेत.

तेजस मार्क-१ ए चे वैशिष्टय काय ?
नव्या ८३ तेजस मार्क-१ ए मध्ये एकूण ४३ सुधारणा करण्यात आल्या आहेत. AESA हे अत्याधुनिक रडार, हवेतच इंधन भरण्याची क्षमता, दृष्टीपलीकडे हल्ला करु शकणारी बीव्हीआर मिसाइल सिस्टिम आणि शत्रू्च्या विमानांची रडार जॅम करणारी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या टेक्नोलॉजीने नवीन तेजस मार्क-१ ए विमाने सुसज्ज असतील. तेजस मार्क-१ ए ची उड्डाण चाचणी २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.