दिल्लीमध्ये मांसापासून बनवलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या रेस्तराँबाहेर आता वापरण्यात येणारं मांस हे हलाल पद्धतीचं आहे की झकटा पद्धतीचं हे नमूद करावं लागणार आहे. वेगवेगळ्या डिशमध्ये वापरलं जाणारं मांस हे कोणत्या पद्धतीचं आहे यासंदर्भात ग्राहकांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या (एसडीएमसी) स्थायी समितीने प्रस्ताव संमत केला आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिकेमध्ये मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. तिथे या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर यासंदर्भात सूचना जारी करण्यात येणार आहे. मात्र यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हलाल पद्धतीचे मांस हे हिंदू तसेच शीख धर्मातील भावनांच्या विरोधात आहे असं भाजपाच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एसडीएमसीने म्हटलं आहे.

“हिंदू तसेच शीख धऱ्मामध्ये हलाल पद्धतीचं मांस खाणं निषिद्ध मानलं जातं. असं मांस खाणं या धर्मांच्या विरोधात आहे. त्यामुळेच समितीने रेस्तराँ तसेच मांस विक्री करणाऱ्यांनी त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचं मांस मिळतं हे स्पष्टपणे ग्राहकांना सांगणं बंधनकारक करण्यासंदर्भातील प्रस्ताव संमत केला आहे. मांस हे हलाल आहे की झटका पद्धतीचं आहे हे स्पष्टपणे दुकानामध्ये लिहिलेलं असावं,” असं एसडीएमसीने पास केलेल्या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

एसडीएमसीच्या स्थायी समितीचे प्रमुख राजदूत गेहलोत यांनाही यासंदर्भात बोलताना, “समजा एखाद्याला झटका पद्धतीचं मांस हवं आहे आणि त्याला हलाल मांस दिलं तर त्याच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे मांस हे झटका आहे की हलाल एवढं नमूद करावं अशी ही कल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याकडे झटका पद्धतीच्या मांस विक्रीचा परवाना असेल आणि तो हलाल पद्धतीचं मांस विकत असेल तर अशा गोष्टींना यामुळे अळा घालता येईल,” असं म्हटलं आहे.

एसडीएमसीचे नेते नरेंद्र चावला यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. काही लोकांना हलाल तर काही लोकांना झटक्याच्या मांसाबद्दल आक्षेप असतो. काहींना झटक्याचं मांस आवडत तर काहींना हलाल मांस. आपण मागवलेल्या पदार्थात वापरलं जाणारं मांस हे कोणत्या प्रकारचं आहे हे जाणून घेण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. शीख समुदायाकडून मागील अनेक वर्षांपासून यासंदर्भातील मागणी वारंवार केली जात होती. त्यांच्याकडे हलाल पद्धतीचं मांस खाल्लं जात नाही. त्यामुळे यात काहीही वादग्रस्त नाहीय, असंही चावला म्हणाले. आपल्या समोर वाढण्यात आलेला पदार्थ कसा बनवण्यात आलाय हे जाणून घेणं ग्राहकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळेच सध्या स्थायी समितीने हा प्रस्ताव संमत केला आहे. लवकरच महापालिकेच्या सदनामध्ये याला संमती मिळेल अशी अपेक्षा आहे, असंही चावला म्हणाले.

एसडीएमसीच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक १०४ मध्ये हजारो मांस विक्री करणारी दुकानं, हॉटेल आणि रेस्तराँ आहेत. त्यामुळेच सभागृहामध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास या सर्वांना नवीन नियमाप्रमाणे मांस कोणत्यापद्धतीचं आहे ते दुकानासमोर लिहावं लागणार आहे.

काय आहे फरक?

एकदाच वार करुन प्राण्यापासून जे मांस मिळतं त्याला झटका पद्धतीचं मांस म्हणतात. तर प्राण्यांचा जीव घेताना त्याची नस कापून त्यामधून रक्त वाहून दिलं जातं याला हलाल करणं असं म्हणतात. या पद्धतीचं मांस प्रामुख्याने मुस्लीम समुदायामध्ये खाल्लं जातं.