कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने काँग्रेसचाच जाहीरनामा कॉपी केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यातील अर्धी वचने आमच्या जाहीरनाम्यावरून उचलण्यात आली आहेत असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाच कर्नाटकचा विकास झाला आणि येडियुरप्पांच्या काळात फक्त भ्रष्टाचार झाला असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम असे म्हणतात की विरोधकांकडे विकासाची दृष्टीच नाही. विरोधक काही ना काही विषय काढून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरीही कुठे विकासाच्या गोष्टी केल्या? त्यांनी तर गांधी घराण्यावर शिंतोडे उडवण्याशिवाय काय केले असाही प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील चार वर्षात एकदाही पत्रकारांच्या समोर जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नरेंद्र मोदींनी काय चार वर्षात काय केले? देशात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती चांगली नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. माझ्या मंदिरांच्या भेटींवरून भाजपाचे नेते माझ्यावर टीका करतात त्यांना मी हे सांगू इच्छितो की मी आत्ताच नाही गेल्या १५ वर्षांपासून मंदिरांमध्ये जातोय, मशिदींमध्ये जातो आहे, गुरुद्वारांना भेटी देतो आहे. माझ्यासाठी सगळे धर्म सारखेच आहेत, मी कट्टर नाही. मी माणुसकी जपतो असे म्हणत राहुल गांधी यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींवर टीका केली.

देशातील दलितांबाबतही नरेंद्र मोदी सरकारचे धोरण चांगले नाही. दलित महिलांवर अत्याचार होतो. अन्याय होतो तरीही त्यांना न्याय मिळत नाही. एवढेच काय या अत्याचाराबाबत नरेंद्र मोदी साधे भाष्यही करत नाहीत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.