देशातील ४० कोटी लोकांवर कर्जाचं ओझं असल्याची माहिती समोर आली आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीच्या (सीआयसीच्या) अहवालामधून ही आकडेवारी समोर आली आहे. देशामध्ये एकूण ४० कोटी लोकसंख्या ही कमवत्या वयोगटातील लोकसंख्या आहे. त्यापैकी अर्ध्यांवर कर्जाचं ओझं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. करोनामुळे अनेकांच्या कमाईवर परिणाम झाल्याने कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलीय.

अहवालानुसार २०२१ सालाच्या जानेवारी महिन्यापर्यंत देशातील एकूण कमवती लोकसंख्या ४० कोटी ७ लाख इतकी होती. तर दुसरीकडे किरकोळ कर्जाच्या (रिटेल लोनच्या) माध्यमातून २० कोटी लोकांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कर्ज घेतल्याचं स्पष्ट होतं आहे. अहवालानुसार या २० कोटी लोकांपैकी प्रत्येकाने किमान एका कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे किंवा त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे.

नक्की वाचा >> Explained : २८.३९ लाख कोटी… करोना कालावधीमध्ये भारतीयांकडे नोटबंदीपेक्षाही अधिक कॅश, जाणून घ्या कारणं

मागील एका दशकामध्ये बँकांनी किरकोळ कर्ज देण्यास प्राधान्य दिल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र करोनाच्या साथीनंतर किरकोळ कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सीआयसीच्या आकडेवारीनुसार ग्रामीण आणि निम-शहरी भागांमध्ये १८ ते ३३ वर्ष वयोगटातील ४० कोटी कमवत्या लोकसंख्येमध्ये गृहित धरल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून अधिक प्रमाणात कर्ज घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. या वयोगटामध्ये सध्या कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण हे केवळ ८ टक्के इतकं आहे.

समजून घ्या >> संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

कर्ज घेणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण हे कमी आहे. गाड्यांसाठी कर्ज घेणाऱ्यांपैकी १५ टक्के महिला आहेत. तर गृहकर्ज घेणाऱ्यांपैकी ३१ टक्के महिला आहेत. खासगी कारणासाठी कर्ज घेणाऱ्यांपैकी महिलांचा वाटा २२ टक्के इतका आहे. कंझ्युमर ड्युरेबल म्हणजेच वस्तूंसाठी कर्ज घेणाऱ्यांपैकी दर चौथी कर्जदार व्यक्ती ही महिला आहे. म्हणजेच कंझ्युमर ड्युरेबल लोनमध्ये कर्जदारांपैकी २५ टक्के महिला आहेत. कर्ज काढणारे कर्जदार ज्या ठिकाणाहून पहिल्यांदा कर्ज घेतात तेथील कर्ज फेडण्याला प्राधान्य देतात असंही या अहवालात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “मी पैजेवर सांगायला तयार आहे की देशात तिसरी लाट येणार नाही”; दलाल स्ट्रीटच्या ‘वॉरेन बफेट’चा दावा

करोनाच्या लाटेमुळे मागील वर्षी लाखो लोकांचा रोजगार बुडाला, अनेकांच्या कमाईमध्ये काटछाट झाली. बेरोजगारीबरोबरच ज्यांचे रोजगार टीकून राहिले त्यांच्या उत्पन्नालाही पगार कपात आणि इतर माध्यमातून फटका बसलाय. या वर्षीही एप्रिलपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आर्थिक संकट अधिक गडद झाल्याचं चित्र दिसून आलं. दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्येही रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नावर आधारित असणाऱ्या भारतीयांना मोठा फटका बसला. द सेंटर फॉर मॉनेटरिंग इंडियन इकनॉमी म्हणजेच सीएमआयईने मागील महिन्यात १ लाख ७५ हजार घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलं. यापैकी केवळ ३ टक्के कुटुंबांनी आपल्या कमाईमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं. तर ५५ टक्के कुटुंबांनी आपल्या कौटुंबिक कमाईमध्ये घट झाल्याचं म्हटलं. तर ४२ टक्के कुटुंबांनी त्यांची कमाई ही मागील वर्षाइतकीच असल्याचं नमूद केलं.