News Flash

गोव्यातील घोटाळ्यांची चौकशी केल्यास निम्मे अधिकारी तुरुंगात, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गौप्यस्फोट

गोव्यातील काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी केली तर निम्म्याहून अधिक नोकरशहांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. लघुउद्योजकांच्या संघटनेच्या

| July 7, 2013 04:07 am

गोव्यातील काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी केली तर निम्म्याहून अधिक नोकरशहांना तुरुंगाची हवा खावी लागेल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. लघुउद्योजकांच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी यापूर्वीच्या कामत सरकारवर चौफेर टीका केली.
गेल्या सरकारमधील अनियमिततेमध्ये सामील नाही, असा स्थानिक अधिकारी सापडणे दुर्मीळ आहे. नोकरभरतीसारख्या घोटाळ्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मी जर कठोर भूमिका घेतली असती तर निम्मे अधिकारी तुरुंगात जातील. त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल, असे पर्रिकर म्हणाले. प्रशासन सुरळीत चालण्यासाठी आपल्याला दीड वर्षांचा कालावधी लागला यावरून यापूर्वीच्या कामकाजाची कल्पना येऊ शकेल, असा टोला त्यांनी लगावला. या अधिकाऱ्यांच्या विरोधात आपल्याकडे थेट पुरावे आहेत. मी सूत्रे हातात घेतली तेव्हा प्रशासन ठप्प होते. अधिकाऱ्यांना कारवाईची चिंता होती. त्यामुळे तत्कालीन मंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्हाला हे गैरप्रकार करावे लागले हे तपास अधिकाऱ्यांना सांगा, असे या बाबूंना सांगावे लागल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. दिगंबर कामत सरकारने भ्रष्टाचाराने प्रशासन पोखरून टाकल्याचा आरोपही पर्रिकर यांनी केला. या सरकारने भ्रष्टाचाराबरोबर प्रशासन संपवून टाकण्याचे दुष्कृत्य केल्याची टीका पर्रिकर यांनी केली.

कॅसिनो सुरू ठेवणार
सरकारला कॅसिनोमधून दीडशे कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याने ते बंद करण्याचा विचार नाही, असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. मी व्यक्तिश: कॅसिनोच्या विरोधात आहे, मात्र ते बंद केल्यास या महसुलाची भरपाई कोठून करणार, असा सवाल त्यांनी केला. मांडवी नदीच्या तीरावर जहाजामध्ये सुरू असलेले कॅसिनो बंद करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. त्यामुळे पर्रिकर सरकार कोंडीत सापडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 4:07 am

Web Title: half the babus will go to jail if scams are probed says goas chief minister
टॅग : Congress,Corruption,Goa
Next Stories
1 ईशान्य नायजेरियात २९ विद्यार्थ्यांची हत्या
2 नितीशकुमार यांच्याशी जवळीक साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, बिहारला केंद्रीय योजनेतून मदत
3 मुलायमसिंह यांचे भाजपशी साटेलोटे बेनीप्रसाद वर्मा यांचा हल्लाबोल
Just Now!
X