पाकिस्तानी तुरुंगातून सुटका झालेल्या हमीद अन्सारीने बुधवारी सकाळी नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यावेळी हमीद सोबत त्याची आई फौझियाही होती. सुषमा स्वराज यांची भेट घेताना हमीद आणि त्याची आई प्रचंड भावूक झाले होते.

सुषमा स्वराज यांचे आभार मानतान हमीदला अश्रू अनावर झाले होते. मुलगा परत मिळाल्याने प्रचंड भावूक झालेल्या फौझियाने “मेरा भारत महान, मेरी मॅडम महान, सब मॅडम ने ही किया हैं” असे उदगार काढले. म्हणजे सुषमा स्वराज यांच्यामुळे आपल्या मुलाची सुटका शक्य झाली असे या आईला म्हणायचे होते.

३३ वर्षीय हामिद अन्सारी मुंबईचा रहिवासी आहे. त्याला पाकिस्तानातील पेशावरमधील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. २५ डिसेंबर २०१५ मध्ये त्याला पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने सुनावलेली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. अन्सारीची फेसबुकवरील ऑनलाईन चॅटिंगदरम्यान एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला.

आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो आतूर झाला होता. त्यासाठी त्याने आपल्याला अफगाणिस्तानात काम मिळाल्याचे घरच्यांना सांगितले आणि तो तिला भेटण्यासाठी पहिल्यांदा अफगाणिस्तानला गेला त्यानंतर तिथून तो बनावट पासपोर्ट बनवून पाकिस्तानात पोहोचला होता. दरम्यान, त्याचा हा अवैध प्रवास पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या रडावर आला.

त्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपखाली ताब्यात घेतले. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्य कोर्टात त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याच्यावर हेरगिरीचे कुठलेही आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानी कोर्टाला अखेर त्याची सुटका करणे भाग पडले. भारत सरकारने त्याला राजकीय मदत पोहोचवण्यासाठी ९६ वेळा संवाद साधला. तसेच त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांतील काही लोकांनीही त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. अन्सारीच्या सुटकेवर समाधान व्यक्त करीत भारत सरकारने पाकिस्तानात असलेल्या ज्या भारतीय मच्छीमारांसहित अन्य भारतीय नागरिकांची शिक्षा पूर्ण झाली आहे, त्यांचीही मुक्तता करण्यात यावी अशी मागणी केली आहे.