‘द व्हेजिटेरियन’ कादंबरीस बहुमान

दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना यंदाचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. कांग यांच्या ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीला हा बहुमान मिळाला आहे.

कांग यांनी नोबेल विजेते ऑरहान पामुक, एलेना फेराँटे यांना पिछाडीवर टाकत ५० हजार पौंडांचा हा पुरस्कार पटकावला. कांग यांची इंग्रजीत अनुवादित झालेली ही पहिली कादंबरी असून, पुरस्काराच्या रकमेतील काही रक्कम भाषांतरकार देबोरा स्मिथ यांना दिली जाणार आहे.

‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी पोटरेबेलो बुक्सने प्रकाशित केली आहे. या पुरस्कारासाठी १५५ पुस्तकांमधून हे पुस्तक एकमताने निवडण्यात आले आहे. पाच परीक्षकांनी ही निवड केली असून, निवड समितीच्या अध्यक्षस्थानी बॉइड टोनकिन होते. ही कादंबरी वाचकांच्या मनाचा ठाव घेते, असे गौरवोद्गार टोनकिन यांनी काढले. कांग या सध्या सोल इन्स्टिटय़ूट ऑफ द आर्ट्स या संस्थेत सर्जनशील लेखन विषय शिकवतात. यी यांग साहित्य पुरस्कार, टुडेज यंग आर्टिस्ट पुरस्कार, कोरियन साहित्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांच्या कांग या मानकरी ठरल्या आहेत.

‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी तीन भागांत असून, त्यात येआँग हाय या कर्तव्यदक्ष कोरियन महिलेची कथा आहे. शाकाहारी बनण्याच्या तिच्या निर्णयाचे तिच्या कौटुंबिक जीवनावर आणि नातेसंबंधांवर झालेले विपरीत परिणाम यावर ही कादंबरी भाष्य करते. ही कादंबरी इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या देबोरा स्मिथ २१ व्या वर्षांपासून कोरियन भाषा शिकल्या आहेत.