शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी मासे विक्री करणाऱ्या हनन हमीद या तरुणीने केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दीड लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना भेटून त्यांच्याकडे ती मदतनिधीचा चेक सुपूर्द करणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हननला काही हितचिंतकांकडून ही रक्कम मिळाली होती. जमा झालेली रक्कम ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे.

केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यात राहणारी हनन बीएसचीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. शिक्षणाचा खर्च उचण्यासाठी ती मासे विक्रीचा व्यवसाय करते. मागच्या महिन्यात कॉलेजच्या ड्रेसवर मासेविक्री करत असल्याचा तिचा एक फोटो व्हायरल झाला. केरळमधील ‘मातृभूमी’ या वृत्तपत्राने हनन हमीदच्या त्या फोटोवरुन बातमी केली. या बातमीचा चांगला परिणाम होऊन तिला अनेक स्तरातून मदतीचे हात पुढे आले. एका दिग्दर्शकांनेही तिला आपल्या चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर हनन हमीदची मासे विक्री हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला प्रसिद्धी स्टंट असल्याची अफवा पसरली. त्यामुळे तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आले.

या सर्व प्रकारानंतर हननने तिचा एका व्हिडिओ पोस्ट करुन अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका अशी विनंती केली. बेताच्या परिस्थितीमुळे मासे विक्री करावी लागत असल्यामुळे तिला समाजातून अनेकांनी मदतीचा हात दिला. माझ्या अकाऊंटमध्ये लोकांनी पैसे जमा केले होते. आता माझ्यापेक्षाही इतर लोकांना मदतीची जास्त गरज आहे. त्यामुळे तिने हे सर्व पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हननचा दिवस पहाटे ३ वाजता सुरु होतो. त्यानंतर एक तास अभ्यास करुन ती सायकलवर बाजारात जाते. तिथून मासे करेदी करुन ती आपल्या ओळखीच्यांकडे हे मासे नेऊन ठेवते. पुन्हा घरी येऊन आवरुन ती ६० किलोमीटरवर असलेल्या कॉलेजला बसने जाते. दिवसभर कॉलेजमध्ये हजेरी लावून ती संध्याकाळी हे मासे विकायला पुन्हा त्या गावी जाते.

तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून तिच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे. तर तिची आई मानसिकरित्या ठिक नसल्याने तिला अशाप्रकारे आर्थिक तजवीज करण्यासाठी काम करावे लागते. याबरोबरच आपल्या कॉलेजच्या फी भरण्यासाठी ती लहान मुलांचे क्लासेसही घेते. हनन हीला अभिनय, डबिंग, कविता करणे यामध्ये विशेष रस असून तीला कलरीपायाट्टू हा मार्शल आर्टही येते.