मध्यप्रदेशातील रतलाममधील एका तांत्रिकाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हातावर चुंबन घेऊन करोना बरा करण्याचा दावा करणाऱ्या या तांत्रिकाचा करोनामुळेच मृत्यू झाला. इतकचं काय तर त्याच्यामुळे २३ जणांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. केवळ रतलामच नाही तर आसपासच्या परिसरातूनदेखील काही लोक अंधश्रद्धा बाळगून या भोंदू बाबाकडे येत होते. केवळ हातावर चुंबन घेऊन मोठे आजार बरा करण्याचा दावा हा तांत्रिक करत होता.

असलम बाबा म्हणून हा तांत्रिक सर्वांच्या परिचयाचा होता. रतलामनजीक नयापुरा भागात तो आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. याच ठिकाणी तो अशा प्रकारे उपचार करण्याचा दावा करत होता. आजार घालवण्याच्या नावावर त्यानं अनेकांकडून मोठी रक्कमही घेतली होती. करोना संकटाच्या दरम्यान त्यानं हा आजारदेखील दूर करण्याचा दावा केला होता.

आणखी वाचा- धक्कादायक! PPE कीट घालून पळाला करोनाबाधित रुग्ण; संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद

हाताचं चुंबन घेऊन उपचार

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार तो तात्रिक लोकांच्या हाताचं चुंबन घेऊन आजार दूर करण्याचा दावा करत होता. तसंच पाण्यावर फुंकर मारून ते पाणी तो आपल्याकडे आलेल्यांना पिण्यासाठी देत होता. अधविश्वासामुळे अनेक जण त्याच्याकडे येत होते. परंतु अचानक त्या तांत्रिकालाच करोनाचा संसर्ग झाला. परंतु त्याची माहिती कोणालाही मिळाली नाही. परंतु त्याची प्रकृती ढासळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आणखी वाचा- धडकी भरवणारी बातमी… एकाच दिवसात १० हजार करोनाबाधितांचा टप्पा प्रथमच पार

२३ जणांना करोनाची लागण

४ जून रोजी त्या तांत्रिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली. त्याच्या मृत्यू नंतर आरोग्य विभागाला त्याच्या कामाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध प्रशासनातर्फे सुरू आहे. आतापर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या २३ जणांचा शोध घेण्यात आला असून त्यांना करोनाची लागण झाल्याचं सिद्ध झालं आहे. तसंच त्यापैकी ७ जण हे त्याच्या कुटुंबातीलच असल्याचं समोर आलं आहे. तर दुसरीकडे अनेक जण भीतीपोटी समोर येत नसल्याचंही म्हटलं जात आहे. दरम्यान, त्या तांत्रिकाला त्याच्याकडे येणाऱ्या लोकांमुळे लागण झाली की त्याच्यामुळे अन्य लोकांना लागण झाली याची माहिती सध्या प्रशासन घेत आहे. त्यानंतर प्रशासनानं त्वरित हालचाल करत अशा २९ तांत्रिकांतना ताब्यात घेतलं आहे.