लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात बांबूचे पंखे

नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या परिसरात प्रथमच देशातील आदिवासींनी बांबूपासून बनवलेल्या  पंख्यांचा वापर केला जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाने असे एक हजार बांबूचे पंखे खरेदी केले आहेत. आदिवासी कला व उत्पादने लोकप्रिय करण्याचा हेतू त्यात आहे. भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने हे पंखे पुरवले असून ते आदिवासींनी  हाताने बनवलेले आहेत. हे पंखे मंत्री, संसद सदस्य व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना दिले जातील. बांबूचे पंखे हे पश्चिम बंगालमधील महाली लोकांनी तयार केलेले आहेत. ते हाताने रंगवले असून त्याची किंमत नगाला दीडशे रुपये इतकी आहे. हा पैसा आदिवासी लोकांना मिळणार आहे, असे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांनी सांगितले. हे पंखे ट्राइब्स इंडिया डॉट कॉम व अ‍ॅमेझॉन डॉट इन वर विक्रीस उपलब्ध आहेत.

मध्य प्रदेशातील शरिया आदिवासींनी राख्या तयार केल्या असून त्या तुळशी, सूर्यफुलात वाढवता येतात. या राख्या ल्युपिन फ्लॉवर, टोमॅटो व रोली अँड चावल या स्वरूपात आहेत. राखीची किंमत १२० रुपये असून त्या ट्राइब्स इंडियाच्या ४२  दुकानातून उपलब्ध आहेत. तसेच ट्राइब्स इंडिया डॉट कॉम, अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, पेटीएम व फ्लीपकार्टवर त्या उपलब्ध आहेत. रक्षाबंधनासाठी कपडेही उपलब्ध असून ते ट्राइब इंडियाच्या दुकानात व ई कॉमर्स संकेतस्थळावर मिळतील. लहान आदिवासी उद्योगांना उत्तेजन हा यातील हेतू असल्याचे कृष्णा यांनी सांगितले. यातून आदिवासींना मोठी बाजार पेठ मिळणार असून ट्राइब्स इंडियाची देशातील १६ प्रादेशिक कें द्रे आदिवासींकडून कलावस्तूंची थेट खरेदी करीत असतात असे त्यांनी स्पष्ट केले.