पोलिओमुळे बालपणीच अपंगत्व आलेले ४२ वर्षीय डी रवी देशातील वेगवेगळ्या कारणांमुळे अपंग बनलेल्या लोकांचे प्रश्न देशवासीयांसमोर यावेत आणि जनजागृती व्हावी या उद्देशाने चेन्नई ते दिल्ली असा सलग २४ तासांचा प्रवास चारचाकी वाहन चालवून करणार आहेत. विशेष म्हणजे अपंग व्यक्तींनी मोटारीने सर्वाधिक जलदगतीने प्रवास करण्याचा ते गिनीज बुक विक्रमही पुढील महिन्यात नोंदविणार आहेत. व्यक्ती अपंग बनली की सारे काही संपते असे नाही, अपंग व्यक्तीची जिद्द त्याला अशक्य ते शक्य करून दाखविते हेच जणू डी. रवी यांना जगाला दाखवून द्यायचे आहे.
वास्तविक दोन वर्षांचे असतानाच डी. रवी पोलिओमुळे अपंग झाले. डी. रवी यांना चालताना कुबडय़ा घ्याव्या लागतात. एलआयसी ऑफ इंडियाच्या कृष्णगिरी शाखेत साहाय्यक म्हणून नोकरी करीत असलेल्या डी. रवी यांनी दोन वर्षांपूर्वी स्विफ्ट गाडी घेतली. या गाडीत त्यांनी सर्व गिअर्स हाताने टाकता येतील अशा प्रकारे वैशिष्टय़पूर्ण बदल करून घेतले. आता ते रोज वेलोरे जिल्ह्य़ातील अम्बूर येथून कृष्णगिरी येथील कार्यालयापर्यंतचा ८० किलोमीटरचा प्रवास स्वत: गाडी चालवून करतात. गाडी घेतल्यापासून डी. रवी यांनी आतापर्यंत जवळपास ५५ हजार किलोमीटर गाडी चालवली आहे.
अपंग व्यक्तींचे प्रश्न, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकटय़ाने जाण्यासाठी पडणारे कष्ट, त्यांच्या हक्कांची जाणीव याबाबत अपंग व्यक्ती आणि समाजामध्येही जनजागृती व्हावी हा आपल्या चेन् नई-दिल्ली चारचाकी वाहन चालविण्याच्या मोहिमेचा मूळ उद्देश असल्याचे डी. रवी यांनी स्पष्ट केले.
१६ सप्टेंबर रोजी चेन्नई ते दिल्ली न थांबता प्रवास करण्याचा डी. रवी यांचा मानस असून बंगळुरू, हुबळी, पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि जयपूरमार्गे जाण्याचे त्यांनी ठरविले आहे. प्रवासात फक्त इंधन भरणे आणि शौचास जाणे एवढय़ाच कारणांसाठी थांबायचे त्यांनी ठरविले आहे. दरताशी सरासरी १२० किलोमीटर वेगाने गाडी चालवून २४ तासांत चेन्नई ते दिल्ली हे २७६१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचा आपला मानस असून हा प्रवास मी यशस्वीरीत्या पूर्ण करीन, अशी खात्री डी. रवी यांनी दिली.