पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली असल्याचे मान्य न केल्यामुळे मोदी सरकार चीनशी सीमेवर सुरू असलेला संघर्षांची हाताळणी पूर्णत: फोल ठरले, अशी परखड टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा केली.

काँग्रेसच्या कार्यकारणी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत, गलवान खोऱ्यातील चीन संघर्ष, करोनाची परिस्थिती आणि इंधनाची सातत्यपूर्ण दरवाढ या प्रमुख तीन मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. चीनशी असलेल्या सीमावादाचे पर्यावसान गंभीर संघर्षांत झाले आहे, देशासमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे, करोनाच्या साथरोगाची आपत्ती वाढताना दिसते. अशा अनेक समस्यांशी देश झगडत असून त्याला भाजपप्रणित केंद्र सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे, असा शाब्दिक हल्ला सोनिया गांधी यांनी केला.

कुठलीही समस्या असल्याचे नाकारणे हे केंद्र सरकारचे व्यवच्छेदक लक्षण ठरू लागले आहे. गलवान खोऱ्यात ५ मे रोजी चीनने घुसखोरी केली होती व त्याची माहिती केंद्र सरकरला होती. ही समस्या हाताबाहेर जाण्याआधी सोडवण्याऐवजी ती वाढत गेली. त्यातून १५-१६ जून रोजी धुमश्चक्री झाली, असे सोनिया म्हणाल्या. या प्रसंगानंतर केंद्राला व लष्कराला पहिला पाठिंबा काँग्रेसनेच दिला होता. चीन संघर्ष हाताळण्यात केंद्र सरकार पूर्ण अपयशी ठरले असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. परिपक्व मुत्सद्देगिरी आणि निर्णयक्षम नेतृत्व या दोहोंच्या आधारे आगामी कृती केली पाहिजे, असा सल्ला सोनियांनी दिला. चीनच्या घुसखोरीबद्दल मे महिन्यापासूनच काँग्रेसने प्रश्न विचारला होता पण, केंद्राने ही बाब फेटाळली, देशाची दिशाभूल केली, असा आरोप पक्षकार्यकारिणीने केला.

मुत्सद्देगिरीत भारत कुमकुवत झाला असून एकप्रकारे लष्कराचा विश्वासघातच आहे. चीनच्या बिनधोक घुसखोरीमागे केंद्र सरकारचे दिशाहीन परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे, अशी टीका या वेळी राहुल गांधी यांनी केली.

योग्य सल्ला ऐकतो कोण?

करोना साथरोगाची हाताळणी हे केंद्र सरकारचे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे अपयश आहे. आता करोनाची साथ नियंत्रणात आणण्याची जबाबदारी राज्यावर सोपवून केंद्र सरकार मोकळे झाले आहे. पण, हे करताना राज्यांना मात्र वित्तीय सा करण्याचे केंद्राने टाळलेले आहे. लोकांना वाऱ्यावर सोडून दिले असून तुमची काळजी तुम्हीच करा, असाच संदेश केंद्राच्या कृतीतून देण्यात आला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. योग्य सल्ला मोदी सरकारला ऐकायचा नसतो.जगभरात कच्च्या तेलांचे दर घसरत असताना सलग १७ दिवस पेट्रोल-डिझेलची भाववाढ झालेली आहे, असे मत सोनियांनी मांडले.