दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर करण्यात आलेल्या बलात्काराबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कारविरोधी नवा कायदा अधिक कडक करण्यात यावा आणि त्यामध्ये लहान मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी, अशी मागणी स्वराज यांनी केली आहे.
लहान मुलांवर पाशवी बलात्कार करणाऱ्यांना आणि अमानवी, अमानुष कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवावी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्य़ातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही स्वराज यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे. इतकेच नव्हे तर अशा बैठकीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही हजर राहावे, असेही त्या म्हणाल्या.
बलात्काराचे खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित राहू नयेत आणि आरोपींविरुद्ध कारवाई करण्यासाठी विलंब लागू नये यासाठी कायदेशीर यंत्रणा अधिकाधिक परिणामकारक करण्याची गरज असल्याचेही सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.