मुंबईत २००३ मध्ये झालेल्या दुहेरी स्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या तिघांपैकी एक मोहम्मद हानिफ सईद याचा रविवारी रात्री मृत्यू झाला. हानिफ नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. शनिवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सईदच्या मृत्यूबाबत माहिती देताना कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, शनिवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र, दीड तासांच्या अवधीतच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ते समोर येईल. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधीक्षक भोसले यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सईदच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑटोस्पाय झाल्यानंतर हानिफचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.

हानिफ त्याची पत्नी फेहमिदा आणि अशरत अन्सारी या तिघांनी मिळून दोन टॅक्सीमध्ये शक्तीशाली बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. त्यानुसार, २५ ऑगस्ट २००३मध्ये ऐतिहासिक ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि ‘झवेरी बझार’ येथे हे स्फोट झाले होते. यामध्ये ५२ जणांचा मृत्यू झाला होता तर २४४ जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाचा हा कट रचल्याप्रकरणी या तिघांनाही २००९ मध्ये कोर्टाने दहशतवाद प्रतिबंध कायद्यान्वये (पोटा) दोषी ठरवले होते. त्यानंतर सईदची रवानगी पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पुढे मुंबई हायकोर्टाने २०१२ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर नागपूर मध्यवर्ती कारगृहात त्याला पाठवण्यात आले.

या स्फोटामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे तपासादरम्यान उघड झाले होते. दोषींनी स्वतः याची कबुली दिली होती. अशा प्रकारे लष्करने पहिल्यांदात देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी एका कुटुंबाचा वापर केला होता.