गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे स्पष्टीकरण

केरळच्या मलप्पूरम जिल्ह्य़ातील कथित धर्मातराच्या घटनांबाबत केरळ सरकारने अद्याप चौकशी अहवाल सादर केलेला नसल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शनिवारी सांगितले. केरळचा मलप्पूरम जिल्हा हे धर्मातराचे एक मोठे केंद्र असून तेथे धर्मातर घडत असते. महिनाभरात सुमारे १ हजार लोकांचे तेथे धर्मातर केले जाते. हिंदू व ख्रिस्तींना मुसलमान बनवण्यात येते, असा एक अहवाल असल्याचे अहीर म्हणाले.

मे महिन्यात मी तेथे गेलो असताना माझी पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक झाली. महिनाभरात १ हजार लोकांचे धर्मातर कसे काय होते आणि कोणत्या आधारावर, असे मी त्यांना विचारले. असे करणारे लोक गरिबीचा फायदा घेतात, धमक्या देतात की नोकरीचे आमिष दाखवतात? ते नेमके काय करतात हे शोधून काढा असे मी त्यांना सांगितले. आता या प्रकरणाला तोंड फुटते आहे, असे अहिर यांनी सांगितले.

केरळमधील एक विवाह हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले असून, हे प्रकार ठरवून केले जात असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनेही (एनआयए) म्हटले आहे. त्याबाबत अहिर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून त्यावर अधिक बोलण्यास अहिर यांनी नकार दिला.