Happy Birthday Rahul Gandhi : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीत असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. ते ४८ वर्षांचे झाले. देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राहुल गांधीना शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरद्वारे मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो, असं ट्विट मोदींनी केलं.
१९ जून १९७० रोजी जन्मलेल्या राहुल गांधींनी २००४ मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल ठेवलं. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपल्या राजकारणाची शैली बदललेली पाहायला मिळत आहे. आगामी वर्ष राहुल गांधी यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात राहुल गांधी यांच्यासमोरील आव्हानांचा घेतलेला आढावा…

१. गेल्या वर्षी झालेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समाधानकारक यश मिळाले आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटकमधील निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ घटले असले तरी जनता दल सेक्युलरच्या मदतीने त्यांनी कर्नाटकमधील सत्ता कायम ठेवली आहे. आगामी काळात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या भाजपाशासित राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेसकडे सत्ता खेचून आणण्याचे आव्हान राहुल गांधी यांच्यासमोर आहे.

२. राहुल गांधी यांना अजूनही पक्षाच्या कार्यकारी समितीची निवड करता आलेली नाही. जुन्या चेहऱ्यांना वगळून नवीन आणि तरुण नेत्यांना संधी देण्याची राहुल गांधी यांची भूमिका आहे. मात्र, यासाठी त्यांना कटू निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारी समितीची निवड करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.

३. राहुल गांधी यांनी यापूर्वी देशभरात काँग्रेसला मजबूत स्थितीत आणून आघाडीच्या राजकारणापासून लांब राहावे, अशी भूमिका घेतली होती. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून मोदींविरोधात विरोधकांची एकजूट महत्त्वाची आहे, याची जाणीव राहुल गांधी यांना झाली आहे. कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्रीपद देऊन भूमिकेतील बदल दाखवून दिले आहे. राहुल गांधी आता महाआघाडीचे समर्थन करत असून निवडणुकीपूर्वी प्रमुख विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपाला टक्कर देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. महाआघाडीचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे त्यांना विरोधी पक्षांना पटवून द्यावे लागेल. राहुल गांधी यांच्या इफ्तार पार्टीत प्रमुख विरोधी पक्षांमधील ज्येष्ठ नेत्यांऐवजी दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित होते. यावरुनच महाआघाडीचा मार्ग किती अवघड आहे हे दिसते. राहुल गांधींसाठी ही एक अग्निपरीक्षाच ठरणार आहे.

४. राहुल गांधी यांच्यासमोर पक्षांतर्गत मतभेद संपवण्याचे आव्हानही आहे. उदाहरणार्थ हरयाणामध्ये भूपिंदरसिंग हुड्डा आणि प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले आहेत. हरयाणात पक्षातील ब्लॉक तसेच जिल्हास्तरावरील अनेक पदे अजूनही रिक्त असल्याचे समजते. हरयाणात काँग्रेसला संधी असूनही पक्षांतर्गत मतभेदांचा फटका त्यांना बसू शकतो. त्यामुळे पक्षातील वाद निकाली काढण्याची आव्हान त्यांच्यासमोर आहे.

५. भाजपाचे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षाने बूथस्तरावर कार्यकर्त्यांची फौज उभी केली. काँग्रेसलाही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा कार्यकर्त्यांची फौज उभी करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांनी मुंबई दौऱ्यात बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. असेच मेळावे देशभरात घेऊन पक्षसंघटना बळकट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

६. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी राहुल गांधींसाठी मुख्य आव्हान आहे. शाह आणि मोदी जोडी ही सदैव सक्रीय असते. अमित शाह हे तर भाजपाचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाऊ लागलेत. नरेंद्र मोदी हे अजूनही भाजपासाठी स्टार प्रचारक आहे. या तुलनेत राहुल गांधी यांनाही त्यांच्या टीमसाठी असे ‘चाणक्य’ शोधून त्यांना महत्त्वाच्या पदावर संधी द्यावे लागेल.