आत्मगौरव जपण्याच्या नावाखाली देशभरातून ‘पद्मावत’ सिनेमाला करणी सेनेसह अनेक संघटनांनी विरोध केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा राज्यांतील मल्टिपेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय मल्टिपेक्स असोशिएशन ऑफ इंडियानं घेतला आहे. या चित्रपटावरून वाद सुरू असताना गुजरात आणि राजस्थानमधील शाळा, कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात या सिनेमातलं ‘घुमर’ गाणं वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटातील गाणं शाळा किंवा महाविद्यालयात वाजवल्यास किंवा त्यावर नृत्य केल्यास अप्रिय घटना घडू शकते असा धमकीवजा इशारा करणी सेनेनं उदयपूरमध्ये दिला आहे.

महिसागर आणि भावनगरमधील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रक जारी करून शाळेत होणाऱ्या कार्यक्रमात हे गाणं वाजवण्यास मज्जाव केला आहे. ‘पद्मावत सिनेमावरून देशभरात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील कार्यक्रमात या चित्रपटातील गाणं वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सांस्कृतीक कार्यक्रमात या चित्रपटातील गाण्यांवर मुलांनी नृत्य किंवा इतर कलाकृती आयोजित केली असल्यास ते तातडीनं रद्द करावं. या चित्रपटातील गाण्यामुळे शाळेत कोणाताही वाद होणार नाही याची शाळाप्रशासनानं खबरदारी घ्यावी असं जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. भावनगर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनीदेखील अशाप्रकारचं परिपत्रक शाळेनां जारी केलं आहे.

जिल्हाधिकारी एम. डी. मोदीया यांनी आपल्याला या परिपत्रकाबद्दल कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांनी हा आदेश सरकारकडून दिला नसल्याचं सांगितलं आहे. शाळांतील कार्यक्रमात या चित्रपटातील गाणं वाजवण्यात सरकारनं कोणतीही बंदी घातली नाही. काही शाळांनी केवळ सुरक्षेसाठी या चित्रपटातील गाणं न वाजवण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये करणी सेनेनं शाळा किंवा महाविद्यालयात या चित्रपटातील गाणं वाजवल्यास किंवा त्यावर डान्स केल्यास अप्रिय घटना घटू शकते असा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे तिथल्या शाळांनीही वाद होऊ नये म्हणून शाळेत पद्मावत चित्रपटातील गाणी न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे.