असं कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथे महिलांनी स्वत:ला सिद्ध केलं नसेल. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक गोष्ट करतेय. म्हणूनच, पुरुषांपेक्षा कमी लेखलेलं तिला अजिबात आवडत नाही, पटत नाही. घरदार सांभाळून नोकरी करणारी एखादी सामान्य गृहिणी असो किंवा लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात एक नवा इतिहास रचणारी अवनी चतुर्वेदी. प्रगती रोखणारी प्रत्येक चौकट मोडण्याचा प्रयत्न आज महिला करताना पाहायला मिळत आहेत. म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अशा महिलांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, ज्यांच्या कर्तृत्वाची झेप कवेत घेणारा गगनही ठेंगणा वाटू लागेल.

चौकटीबद्ध करिअरच्या वाटेवर न जाता वेगळी दिशा निवडलेल्या अवनीचा संपूर्ण देशाला गौरव वाटत आहे. भारतीय वायूदलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने मिग २१ हे लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात एक नवा इतिहास रचला. कोणत्याही देशाचे हवाई दल हे त्यात असणाऱ्या लढवय्यांमुळे ओळखले जाते. जर त्या लढवय्यांमध्ये अवनीसारख्या कणखर महिला असतील तर क्या बात! इतकंच नव्हे तर गगन भरारी घेणाऱ्या महिलांची संख्या भारतात जास्त असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. जगभरात सर्वाधिक महिला पायलट या भारतातील आहेत असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं होतं. त्यामुळे महिलांची गगन भरारी आता कोणीच रोखू शकणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

Avani Chaturvedi
अवनी चतुर्वेदी

Women’s day 2018 : रिअल इस्टेटमध्येही तिचाच डंका

पुरुषप्रधान संस्कृतीत जी क्षेत्रं फक्त पुरुषांसाठी म्हणून ओळखली जात होती तिथेही आज स्त्रिया शिक्षणाने, स्वत:च्या बुद्धिमत्तेने, कठोर मेहनतीने आणि जिद्दीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूत कार्यरत झाल्या. सैन्यदल, वायुदल आणि नौदलात स्त्रियांना प्रत्यक्ष लढण्याची परवानगी नव्हती. २०१५ साली केंद्र सरकारने त्या संदर्भात विचार सुरू केला असून त्या दृष्टीने पावलंही उचलली जाऊ लागली आहेत. त्याची पहिली प्रचिती अवनीच्या उदाहरणावरून आली. अवनीचा हा पराक्रम येत्या काळात तिच्यासारख्या महत्त्वाकांक्षी तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार हे नक्की.