स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या समर्थकांना पाठिंबा देत रॅपर हार्ड कौरने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांना समोर येऊन भिडण्याचं आव्हान दिलं आहे. हार्ड कौरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या व्हिडीओत तिने मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत.

”स्वतंत्र खलिस्तान हा आमचा हक्क आहे आणि येत्या १५ ऑगस्ट रोजी तो आम्ही मिळवणारच आहोत. येणारा स्वातंत्र्यदिन हा शिखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. त्यामुळे यादिवशी आम्ही खलिस्तानी झेंडे फडकावणार आहोत. आता आम्ही शांत बसणार नाही. युकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांसमोर आम्ही खलिस्तानचा झेंडा फडकावणार आहोत,” असं ते समर्थक या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. त्यांच्यासोबतच हार्ड कौर उभी आहे.

मोदी आणि शाह हे लोकांना घाबरवतात. सैन्यामागे लपून ते आपला अजेंडा राबवतात, असं म्हणत तिने टीका केली आहे. या व्हिडीओत तिने मोदी आणि शाहांसाठी बरेच अपशब्द वापरले आहेत. याआधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी हार्ड कौर विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे हार्ड कौर?

हार्डकौर ही रॅपर व हिप हॉप गायिका आहे. तिचं मूळ नाव तारन कौर धिल्लन असं आहे. ‘एक गिलासी दो गिलासी’ हे रॅप, ‘पैसा फेंक तमाशा देख’ हे तिचं गाणं प्रचंड गाजलं. यासोबतच तिने बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.