महिलांवर जातिआधारित अत्याचार करणारे कायद्याच्या कचाटय़ातून सुटता कामा नयेत. कारण महिलेला जात आणि लिंगभेदावर आधारित अशा दुहेरी अत्याचारांना सामोरे जावे लागते, भारतीय समाजाला लागलेला हा डाग आपल्याला पुसून टाकता आला पाहिजे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क प्रमुख नावी पिल्ले यांनी केले.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या पाश्र्वभूमीवर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आपल्या हक्कांचा गैरवापर करणारे नेहमीच उजळ माथ्याने समाजात वावरत असतात. हा प्रकार संपविता आला पाहिजे. नावी पिल्ले या भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकन आहेत. महिलांविरोधातील अन्याय, अत्याचारांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा खराब झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशातील बदाऊं येथे दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवल्याच्या घटनेनंतर देशात मोठा असंतोष पसरला. अत्याचाराला बळी पडलेल्या दोघी खालच्या जातीतील असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही. याचा निषेध म्हणून मुलींच्या कुटुंबीयांनी त्यांचे मृतदेह झाडावरून उतरवण्यास नकार दिला. ही घटना आपल्या समाजाला शोभा देणारी नाही, असे पिल्ले म्हणाल्या. भेदभावाची वागणूक आणि हिंसाचार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, हे कायदा राबवून आपल्याला सांगता आले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.