पटेल आरक्षणाचा नेता हार्दिक पटेल याला तिरंग्याचा अपमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आता त्याच्यावर ‘पटेल युवकांनी आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारावे’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हार्दिक याला राजकोट ग्रामीण पोलिसांनी भारत-आफ्रिका एकदिवसीय सामना बंद पाडण्याच्या कारवाया प्रकरणी तसेच राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. आम्ही चित्रफिती बघितल्या असून त्याने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्यावर पढारी पोलिस स्थानकात आज प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली, असे राजकोट ग्रामीणचे पोलिस अधीक्षक गगनदीप गंभीर यांनी सांगितले. त्याने पटेल युवकांनी आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारावे असे वक्तव्य तीन ऑक्टोबरला केले होते त्या प्रकरणी सुरतचे पोलिस उपायुक्त मकरंद चौहान यांनी हार्दिकवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात आजन्म कारावास ते तीन वर्षे कारावास अशी कमाल व किमान शिक्षा होऊ शकते. हार्दिकवर कलम ११५ (गुन्ह्य़ास उत्तेजन) कलम १५३ ए (दोन गटात शत्रुत्व निर्माण करणे) कलम ५०५-१ (जनसमुदायांना एकमेकांविरोधात भडकावणे) कलम ५०६ (गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे) यान्वये गुन्हे दाखल आहेत. सुरत शहराचे पोलिस आयुक्त राकेश आस्थाना यांनी सांगितले, की पढारी येथे हार्दिकने जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला राजकोट येथून अटक करण्यात येईल. आम्ही हार्दिकला अटक करण्यासाठी पोलिस पथक राजकोटला पाठवले आहे. जर त्याला जामीन मिळाला तरी त्याला जाबजबाबासाठी सुरतला आणले जाईल.