भाजपने मला बदनाम करण्यासाठी माझी खोटी सेक्स सीडी तयार केल्याचा गंभीर आरोप गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे. माझी बदनामी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी माझी बनावट सेक्स सीडी तयार केली आहे, असा दावा त्याने केला आहे. निवडणुकीच्या काळात ही सीडी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, आपण भाजपकडून दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो? त्यामुळे केवळ पाहा आणि आनंद घ्या,, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले. तुम्हाला या सीडीची माहिती कशी काय मिळाली, असा प्रश्न यावेळी हार्दिक यांना विचारण्यात आला. तेव्हा ही भाजपची जुनी पद्धत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी यांनी हार्दिकच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय द्वंद्व रंगले आहे. यामध्ये काँग्रेसने भाजपविरोधी घटकांची मोट बांधण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. हार्दिक पटेल यांनीही भाजपविरोधी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत काँग्रेसला पाठिंबा देऊ केला होता. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपवर टीका करण्यात हार्दिक पटेल आघाडीवर आहेत. आगामी निवडणुकीत मतदान प्रक्रियेत घोळ करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी निवडणुकीत नादुरुस्त व्हीव्हीपीएटी (VVPAT) यंत्रांचाही वापर केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीत ३५५० यंत्रे नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे, असेही हार्दिक यांनी सांगितले.

युवा मतदारांना भुरळ पाडण्यास नवे चेहरे अपयशी

गुजरातमध्ये ओबीसी मतदारांचे प्रमाण ४० टक्के आहे. तर पाटीदार समाजाचे प्रमाण १२ टक्के असून या समाजालाही आरक्षण द्यावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने आंदोलन केले होते. पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे गुजरातमधील राजकीय चित्र बदलले आहे. अल्पेश ठाकोर यांच्यापाठोपाठ हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपची वाट बिकट झाली आहे.

गुजरातमध्ये जातींची समीकरणे धारदार