पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले आहे. एका खासगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना मोदींनी भजीचा ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. असा सल्ला एखादा चहावालाच देऊ शकतो, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही याप्रकरणी मोदींवर टीका केली होती.

बेरोजगार युवकांना भजीचा ठेला लावण्याचा सल्ला एक चहावालाच देऊ शकतो. अर्थतज्ज्ञ असा सल्ला कधीच देत नाही, असे ट्विट हार्दिक पटेल यांनी केले. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते मणिशकर अय्यर यांनी मोदींना चहावाला असे संबोधले होते. मोदींनी नंतर आपल्या प्रत्येक भाषणात हाच मुद्दा उपस्थित करत जनतेच्या भावनेला हात घातला होता. मोदींना चहावाला म्हणणे काँग्रेसला नंतर चांगलेच महागात पडले होते.

मोदींच्या या वक्तव्याची खिल्ली उडवणारे ट्विट अखिलेश यादव यांनीही केले होते. बेरोजगार युवकांची थट्टा करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. जर एखादा व्यक्ती भजी विकत असेल तर तो संध्याकाळी २०० रूपये कमावून घरी जातो. मग याला तुम्ही रोजगार मानाल का ?, असे मोदी यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले होते.

‘टाइम्स नाऊ’ या वृत्त वाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान म्हणाले होते की, भारतात रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी पूर्वीच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. रोजगाराबरोबर देशाच्या विदेशी निती आणि विदेशात भारत मजबूत होत आहे. त्यामुळे भारताची प्रतिमाही सुधारल्याचे ते म्हणाले होते.