अहमादाबाद-वीरमगाव. रूंद चौपदरी महामार्ग. आजुबाजूला साऱ्या शहरीकरणाच्या गडद खुणा. वीरमगावच्या अलीकडे पाच किलोमीटरवर सोकली फाटा. तेथून चंद्रनगरला जाणारी वाट फुटते. हे हार्दिकचे जन्मगाव. त्या अरूंद रस्त्यावर वळल्याबरोबर अचानक ते शहरीकरण लुप्त होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेते, सीमेंटचे कालवे दिसू लागतात. थोडे पुढे गेल्यावर डोक्यावरून गवताचे भारे वाहून नेणाऱ्या काही स्त्रीया भेटल्या. त्यांच्याकडे चौकशी केली, हार्दिकचे गाव कुठेय? हा रस्ता बरोबर आहे ना? त्यांनी उत्साहाने मार्गदर्शन केले..

भारतातल्या कोणत्याही गावासारखेच हे एक गाव. छोटेसे. साधारण शंभर उंबऱ्याचे. धड रस्तेही नाहीत तेथे. गावाच्या वेशीवरच एक तरुण दिसला. वीस-बावीस वर्षांचा असावा. ‘बाईक’वर बसून ‘मोबाईल’वर बोलत होता. हा राजन पटेल. अहमदाबादमधल्या विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतो तो. हार्दिकचा विषय काढताच तो सांगू लागला, ‘हार्दिकला मी लहानपणापासून ओळखतो. इथंच तर राहायचा. तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा. इथं आठवीपर्यंत शाळा आहे. तिथंच आम्ही शिकलो. नंतर त्याचे वडील रोजगारासाठी वीरमगावला गेले. मीसुद्धा नंतर नातलगांकडे अहमदाबादला शिकायला गेलो.’

चारशे ते साडेचारशे लोकवस्तीचे ते गाव. पण मुलांची संख्या ४०- ५० पेक्षा जास्त नाही. तेथील सरपंच सांगत होते, ‘गावातली दोनशे-अडीचशे माणसं शहरांकडे गेली आहेत. उरलीत ती फक्त म्हातारी माणसं. इथल्या सरकारी शाळेचं पाहा. मोजून २५ मुलं आहेत आणि पहिली ते आठवीसाठी एकूण तीन शिक्षक. दुसरी खासगी शाळा आहे, पण ती थेट वीरमगावला, पाच किलोमीटर अंतरावर. जायचं-यायचं तर किमान सायकल हवीच. तिथं वसतिगृहही आहे. पण लहान मुलांना कसं पाठवणार तिथं?’

गावकऱ्यांनी हार्दिकचे घर दाखवले. एका शेतकऱ्याचे ते घर. दरवाजाबाहेर ट्रॅक्टर उभा होता. मुख्य दरवाजाला लागूनच दोन खोल्या. त्यापुढे ओटय़ावर, टाइल्स लावलेले स्वयंपाकघर. शेजारी गोठय़ात म्हशी बांधलेल्या. अंगणात हार्दिकची काकी धुणीभांडी करीत होती. त्याची चुलतबहिण अंगणातल्या फरशा पुसत होती.

हार्दिकचे पाच काका. त्यांपैकी सर्वात मोठे जीवनभाई आणि कांचनभाई. मोठय़ा अगत्याने त्यांनी आत बोलावले. ‘काय म्हणतेय शेतीवाडी?’ असे विचारल्यावर कांचनाईंनी पावसाच्या सरींकडे पाहून मान हलवली. म्हणाले, ‘या अवकाळी पावसाने ही शेतीही हातची जाणार. या भागात जीरे, कापूस, गहू यांची शेती होते. पण सगळंच निसर्गावर अवलंबून. त्यात प्रत्येकाच्या वाटय़ाला खूपच कमी जमीन येते.’ बाजूलाच त्यांचे वृद्ध वडील बसलेले. त्यांच्याकडे पाहून कांचनभाई म्हणाले, ‘यांच्या नावावर ४० बिघा जमीन होती. आम्ही सहा भाऊ. प्रत्येकाच्या वाटय़ाला किती येणार?’

शेतीतून भागत नाही म्हणून हार्दिकचे वडील भरतभाई २२ वर्षांपूर्वी वीरमगामला निघून गेले. बोअरवेलना पंप लावून देण्याचे काम ते करतात. गोविंदभाई त्याआधी साणंदला गेले. तिथे त्यांचे खतांचे दुकान आहे. महेशभाई सुरतला इलेक्ट्रिशियनचे काम करतात आणि सर्वात धाकटे बंधु जयंतीभाई बडोद्याला ओएनजीसीमध्ये अभियंता आहेत. दोन भाऊ  मूळ घरात आणि बाकी चौघे चार दिशेला पांगलेले. गावातल्या घराघरांतली ही कहाणी.. शेजारीच राहणारे मनोहरभाई पटेल सांगत होते, ‘इथले काहीजण निरमा कंपनीत कामाला जातात. पण महिन्याला आठ-दहा हजार रुपयेच मिळतात. शेतीवाडी आणि नोकरी असे दोन्ही सांभाळले तरच घरखर्च भागतो.’ हे हार्दिकच्या गावाचे, विकासाच्या चांदण्याची वाट पाहात असलेल्या चंद्रनगरचे चित्र..