गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधी आघाडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाला शह देण्यासाठी त्यांच्याच रणनीतीचा वापर करायचे ठरवले आहे. त्यानुसार लवकरच हार्दिक पटेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्तीवर पाटीदार अनामत आंदोलन समितीचे प्रचारक तयार करणार आहेत. हे प्रचारक राज्यभरात जाऊन संघटनेचा प्रचार करतील.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार समितीला फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे हार्दिक पटेल यांनी आगामी काळात शहरी भागावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. त्यासाठी सुरूवातीला पाटीदार समितीच्या २,४९० प्रचारकांची फळी उभारण्यात येईल. हे प्रचारक भाजपाकडून करण्यात येणाऱ्या खोट्या विकासाच्या दाव्यांबद्दल आणि भाजपाच्या धार्मिक राजकारणाविरोधात लोकांमध्ये जनजागृती करतील. त्यासाठी तालुका स्तरावर प्रत्येकी २५६ प्रचारकांची फळी तयार करण्यात येईल, असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.

योगायोगाची गोष्ट म्हणजे हार्दिक पटेल यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेसाठी (विहिंप) काम केले आहे. मात्र, २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांना भाजपा आणि अन्य संघटनांपासून फारकत घेतली होती. याशिवाय, पाटीदार समितीचे अनेक कार्यकर्तेही भाजपा आणि संघ परिवाराशी संबंधित होते. हार्दिक आणि अन्य कार्यकर्त्यांना संघाची कार्यपद्धती चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे भाजपाला त्यांच्यात भाषेत प्रत्युत्तर देणे शक्य होईल, असा पाटीदार समितीचा अंदाज आहे.

भजी विकण्याचा सल्ला मोदींसारखा चहावालाच देऊ शकतो: हार्दिक पटेल

दरम्यान, याविषयी गुजरातमधील संघाचे प्रमुख मुकेश मलकान यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, हार्दिक पटेल यांचा हा निर्णय चांगला आहे. कोणीतरी आमच्या पद्धतीने काम करू पाहत असेल तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. हार्दिक अजूनही खूप लहान आहे. तो जेव्हा खरंच आमच्याप्रमाणे काम करायला लागेल तेव्हा तो संत बनेल, असे मुकेश मलकान यांनी सांगितले.

हार्दिक पटेलने घेतली तोगडियांची भेट, मोदी-शहांनी कट रचल्याचा केला आरोप