गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपविरोधी मोहीम उघडली आहे. जुनागड जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी झालेल्या सभेत बोलताना त्याने राज्यातील पाटीदार समाजाला भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले. पाटीदार समाजाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. २००२ मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीनंतर पाटीदार समाजाच्या १४० व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले होते. ते लोक अजूनही तुरूंगात खितपत पडले आहेत. भाजपने त्यावेळी फक्त आपल्या मतांचा आणि पैशाचा वापर करून घेतला. त्या मोबदल्यात भाजपने पाटीदार समाजासाठी काहीच केले नाही, असा आरोप यावेळी हार्दिकने केला.

आता विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजपकडून तुम्हाला अनेक गाजरं दाखवली जातील. ते तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या सगळ्याला भुलू नका. एवढंच काय माझे वडील भाजपच्या तिकीटावर उभे राहिले तर त्यांनाही मत देऊ नका, असे हार्दिकने सांगितले. हार्दिकचे वडील भरत पटेल जुनागढमधील केशोद मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणात गुजरातमध्ये पुन्हा भाजपला सत्ता मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. या निवडणुकीत तब्बल १४४ ते १५२ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला अवघ्या २६ ते ३२ जागा जिंकता येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. गुजरातमधील सर्वच भागांमध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. एबीपी न्यूज, लोकनिती, सीएसडीएसकडून हे सर्वेक्षण करण्यात आले. भाजपने २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ६१, तर इतर पक्षांना ४ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये २९ ते ३७ जागांची वाढ होण्याचा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.