गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाला तीन वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटीदार नेता हार्दीक पटेलने शनिवारपासून उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. जर प्रशासनाने उपोषणाला बसण्याची परवानगी दिली नाही किंवा जामीन रद्द करण्यात आला तरी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचं हार्दीक पटेलने स्पष्ट केलं आहे. तीन वर्षापूर्वी 25 ऑगस्ट 2015 रोजी गुजरातमध्ये पाटीदार आरक्षणासाठी आंदोलन झालं होतं. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार तसंच सार्वजनिक संपत्तीचं नुकसान झालं होतं. हिंसाचारात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता.

गांधीनगरचे जिल्हाधिकारी एस के लंगा यांनी हार्दीक पटेलला सत्याग्रह छावणी परिसरात उपोषण करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. दरम्यान सत्र न्यायालायत एका प्रकरणी हार्दीक पटेलचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली असून, सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हार्दीक पटेलने जरी माझा जामीन रद्द झाला तरी उपोषण करणार असल्याचं सांगितं आहे. जर प्रशासनाने परवानगी दिली नाही तर घरीच आपण उपोषणाला बसू असंही त्याने सांगितलं आहे.

यावेळी हार्दीक पटेलने राज्य सरकारवर टीका करत, ‘भाजपा सरकार मला घाबरत असल्याने परवानगी देत नाही आहे, गरज पडली तर माझ्या घरी बसून उपोषण करेन. मी उपोषणाला बसू नये यासाठी अनेक प्रयत्न केले जातील’, असं म्हटलं आहे.