पाटीदार आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेला पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याची प्रकृती बिघडली असून प्रशासनाच्यावतीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २५ ऑगस्टपासून हार्दिकने उपोषण सुरु केले होते. उपोषणाच्या दहाव्या दिवसापासूनच त्याची प्रकृती बिघडली होती त्यामुळे त्याला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागत होता.


सुत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी हार्दिकला रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर हार्दिकचे शेकडो समर्थकही रुग्णालयाच्या बाहेर जमा झाले आहेत. हार्दिकच्या प्रकृतीचा विचार करता १६ रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक हार्दिकच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन आहे. मात्र, अद्याप रुग्णालयाकडून अधिकृतरित्या हार्दिकच्या प्रकृतीबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, मंगळवारी गुजरातच्या भाजपा सरकारने रात्री गांधीनगरमध्ये पाटीदार समाजाच्या अनेक नेत्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर बुधवारी हार्दिकने अट ठेवली होती की जर सरकार त्याच्या मागण्यांवर विचार करणार असेल तर तो उपोषण सोडेल. त्याचबरोबर त्याने सरकारला अल्टिमेटम दिला की, जर भाजपाने २४ तासांत त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तो पाण्याचाही त्याग करेल. त्यानंतर त्याने गुरुवारी संध्याकाळपासून पाणी पिणेही बंद केले होते. त्यामुळेच त्याची प्रकृती आज अधिकच खालावली व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.