पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन यांनी भारताच्या दबावामुळे श्रीलंकन खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नसल्याचे वक्तव्य केले होते. परंतु श्रीलंकेचे क्रीडामंत्री हरीन फर्नांडो यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड करत श्रीलंकन खेळाडूंवर भारताचा कोणताही दबाव नसल्याचे स्पष्ट केलं. तसंच ज्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यातून माघार घेतली त्यांनी 2009 मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ नका असं भारताकडून श्रीलंकन खेळाडूंना सांगितले जात आहे. तुम्ही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली नाहीत, तर तुमची IPL मधून हकालपट्टी केली जाईल, असं भारताकडून त्या खेळाडूंना धमकावण्यात आले असल्याचे क्रीडा समालोचकांकडून मला समजले आहे. हे खूपच खेदजनक आहे. क्रीडा विभागापासून ते अंतराळ क्षेत्रातील स्पर्धेपर्यंत भारताच्या जळाऊवृत्तीचा निषेध केलाच पाहिजे. भारतीय क्रीडा विभागाची ही वागणुक अत्यंत चुकीच्या प्रकारची आहे”, असे आरोप चौधरी यांनी केले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“या अहवालांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भारताकडून श्रीलंकेच्या खेळाडूंवर कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही. 2009 च्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या भावनांचा सन्मान करून आम्ही त्यांना संघात सामिल केले नाही. आमचा संघ पाकिस्तानमध्ये जाऊनच पाकिस्तानी संघाचा पराभव करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असं फर्नांडो म्हणाले. लसिथ मलिंगा, अँजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल या खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2015 आणि 2018 मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या संघांशिवाय कोणत्याही संघांनी पाकिस्तानचा दौरा केला नाही.