हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर भारताने जास्त आयात कर लावण्याबाबत आक्षेप घेणाऱ्या अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी आता हार्ले डेव्हिडसनने या गाडीचे उत्पादन काही प्रमाणात परदेशात सुरू केल्याबाबत कंपनीवर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे आम्ही हार्ले डेव्हिडसनची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न करीत आहोत पण या कंपनीने त्यांचे उत्पादन युरोपीय समुदायातील देशात हलवण्याचे ठरवले आहे हे योग्य नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. युरोपीय समुदायाने हार्ले डेव्हिडसनवरील आयात शुल्क वाढवल्यानंतर आता कंपनीने युरोपीय समुदायातील देशातच उत्पादन करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की, हार्ले डेव्हिडसन कंपनीचा निर्णय आश्चर्यकारक असून कंपनीने एक प्रकारे पांढरे निशाण फडकावले आहे. अमेरिकेबाहेर हार्ले डेव्हीडसनचे उत्पादन भारत, ब्राझील व ऑस्ट्रेलियात केले जाते. ट्रम्प यांनी वारंवार भारतात हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवर जास्त आयात शुल्क असल्याबाबत आगपाखड केली होती. त्यामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध सुरू असतानाच आता युरोपनेही ट्रम्प यांना अडचणीत आणले आहे.

कंपनीने काल अमेरिकी रोखे व विनिमय आयोगाला असे सांगितले की, युरोपीय समुदायाने आयात शुल्क सहा टक्क्यांवरून ३१ टक्के केल्याने अमेरिकेतून युरोपीय समुदायात निर्यात केलेल्या मोटारसायकलींची किंमत २२०० डॉलर्सने वाढली आहे. त्यामुळे हा आर्थिक भार सोसण्यापेक्षा आम्ही युरोपीय समुदायातील काही देशांत उत्पादन सुरू करणार आहोत. हार्ले डेव्हिडसन कंपनीने म्हटले आहे की, युरोपीय समुदायातील देशात ९ ते १८ महिन्यांत उत्पादन प्रकल्प सुरू होतील. हार्ले डेव्हिडसन कंपनीसाठी आम्ही एवढी बाजू लावून धरली तरी त्यांनी हा निर्णय घेतला आहे, युरोपीय समुदायाने आयात शुल्क कमी करावे  यासाठी प्रयत्न केले होते, कर १५१ अब्ज डॉलरनी कमीही करण्यात आला होता.