अनेकांची ड्रीम बाईक असणारी हार्ले डेव्हिडसन बाईक तुम्हाला मोफत मिळाली तर? नाही काही लॉट्री वगैरेबद्दल किंवा लकी ड्रॉबद्दल नाही बोलत आहोत आम्ही पण खुद्द कंपनीनेच मोफत हार्ले डेव्हिडसन देण्याची ऑफर देऊ केली आहे. हार्ले डेव्हिडसनने नुकतीच समर इंटर्नशीप प्रोग्रामची घोषणा केली. या प्रोग्रामअंतर्गत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ महाविद्यालयीन तरुणांना नोकरी देण्यात येईल. विशेष म्हणजे या अडीच महिन्याच्या जॉब ऑफरमध्ये पगाराबरोबरच ती बाईकही मुलांच्या मालकीची होईल.

अमेरिकेतील मिलवॅयुकी शहरात मुख्यालय असणाऱ्या हार्ले डेव्हिडसनने दिलेल्या माहितीनुसार आठ महाविद्यालयीन तरुणांना बाईक चालवण्याचे प्रशिक्षण कंपनीमार्फत देण्यात येईल. या मुलांनी या बाईकवरुन अमेरिकेत फिराणे अपेक्षित आहे. आणि प्रवासामध्ये या बाईकचा परफॉर्मन्स कसा वाटला याबद्दल वेळोवेळी सोशल मिडीयावर वेगवेगळ्या पोस्ट करायच्या आहेत. एकूण १२ आठवडे या मुलांनी बाईकवर अमेरिकेतील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भटकंती करुन बाईकसंदर्भातील चांगल्या वाईट गोष्टी सोशल मिडीयावर पोस्ट कराव्या लागतील. यासाठी त्यांना ठरलेल्या मासिक पगाराबरोबरच ते १२ आठवडे वापरत असलेली हार्लेली डेव्हिडसन बाईकही देण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे.

या इंटर्नशीपसाठी अर्ज करणाऱ्याचे वय १८ किंवा त्याहून अधिक हवे असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या लोकांना सोशल मिडीयावर चांगले लिहीता येते, छान फोटो आणि व्हिडीओ काढून पोस्ट करता येतात त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच ज्यांना सोशल मिडीयाच्या फिल्डमध्ये करियर करायचे आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर मग करताय ना तुम्ही पण अर्ज या अनोख्या इंटर्नशीपसाठी?